35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्या‘जेएनयू’वर पुन्हा फडकला लालबावटा

‘जेएनयू’वर पुन्हा फडकला लालबावटा

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीमध्ये यंदा इतिहास घडला. तब्बल तीन दशकांनंतर डाव्या आघाडीच्या पाठिंब्यावर विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी दलित चेहरा मिळाला आहे. या निवडणुकीत डाव्या आघाडीच्या पॅनलने उजव्या विचारधारेच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांना (अभाविप) अस्मान दाखविताना चारीमुंड्या चित केले.

नुकत्याच पार पडलेल्या या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी झाली. तब्बल चार वर्षांनंतर ही निवडणूक होत असल्याने सा-यांचेच लक्ष ‘जेएनयू’कडे लागून राहिले होते. ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’च्या (आयसा) धनंजय यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये बाजी मारली. त्यांना २ हजार ५९८ मते मिळाली तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेश सी. अजमीरा यांना १ हजार ६७६ मतांवरच समाधान मानावे लागले. मुळचे बिहारचे गया येथील असलेले धनंजय हे डाव्या आघाडीच्या पाठिंब्याने विजयी झालेले पहिले दलित अध्यक्ष आहेत. याआधी १९९६-९७ मध्ये बत्तीलाल बैरवा यांना हा मान मिळाला होता. विद्यार्थ्यांच्या डाव्या आघाडीमध्ये आयसा, डेमोक्रॅटिक स्टुडंट्­स फेडरेशन (डीएसएफ), स्टुडंट्­स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि ऑल इंडिया स्टुडंट्­स फेडरेशन या संघटनांचा समावेश होता

या विजयानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना धनंजय म्हणाले, ‘जेएनयू’मधील विद्यार्थ्यांनी द्वेषाच्या आणि हिंसेच्या राजकारणाचा पराभव केला आहे. विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखविला. विद्यार्थ्यांच्या हितासाठीचा आमचा लढा हा सुरूच राहीन. विद्यार्थिनींची सुरक्षा, निधीमधील कपात, शिष्यवृत्ती आणि पायाभूत सेवा तसेच अन्य सुविधांबाबत आम्ही आवाज उठवीत राहू, असे धनंजय यांनी सांगितले.

उपाध्यक्षपद ‘एसएफआय’कडे
उपाध्यक्ष पदासाठीच्या लढतीमध्ये अविजित घोष (स्टुडंट्स फेडरशेन ऑफ इंडिया) यांनी ‘अभाविप’च्या दीपिका शर्मा यांचा ९२७ मतांनी पराभव केला. घोष यांना २ हजार ४०९ मते मिळाली, तर शर्मा यांना १ हजार ४८२ मते मिळाली. सरचिटणीस पदाच्या निवडणुकीत ‘बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्­स असोसिएशन’च्या प्रियांशी आर्या यांनी बाजी मारली. सहसचिवपदी डाव्या आघाडीचे साजिद विजयी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR