27.6 C
Latur
Saturday, March 28, 2026
Homeसंपादकीयझिरवाळ संकटात!

झिरवाळ संकटात!

राज्यात भोंदूबाबा अशोक खरातचे लैंगिक शोषणाचे प्रकरण गाजत असताना, त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित एक कथित आक्षेपार्ह व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे झिरवाळ यांच्यावर नैतिकतेचे प्रश्न उपस्थित होत असून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित व्हीडीओ सात महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हीडीओमध्ये झिरवाळ एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत शासकीय निवासस्थानी दिसत असल्याचा दावा केला जात आहे. खोलीत मद्य व खाद्यपदार्थही दिसत असल्याची चर्चा आहे. मात्र या व्हीडीओची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून, त्यातील दाव्यांची सत्यता तपासली जाणे आवश्यक आहे. या व्हीडीओत दिसणा-या व्यक्तीबाबतही काही दावे समोर आले आहेत. संबंधित व्यक्तीवर कुरार पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एका जबाबदार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अशा प्रकारच्या व्यक्तीची उपस्थिती आणि त्या संदर्भातील आरोपांमुळे नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

झिरवाळ यांचा व्हीडीओ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी केली, तर हा प्रकार महायुतीतील पक्षांमधील आपसातल्या गँगवॉरचा आहे की काय, अशी शंका विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. यातील व्यक्तीच्या जवळच्या मंडळींनी ब्लॅकमेलिंगच्या हेतूने हा प्रकार उघड केला आहे की काय, असाही संशय त्यांनी नोंदवला. गेल्या महिन्यात, आपल्या कार्यालयातील सहायकाला लाच घेताना पकडण्यात आल्याने झिरवाळ वादाच्या भोव-यात सापडले होते. मात्र त्याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. झिरवाळ यांच्या शासकीय निवासस्थानी ते तृतीयपंथी महिलेसोबत दिसून येत असल्याचे व्हीडीओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर या संदर्भात आपली भूमिका मांडताना आमदार रोहित पवार म्हणाले, व्हीडीओत दिसणारे सर्वजण १८ वर्षांपेक्षा जास्त आहेत. ते सज्ञान आहेत. त्यामुळे कोणाची तक्रार नसेल तर त्यावर राजकीय बोलणं उचित नाही.

मात्र, महिलेची तक्रार असल्यास झिरवाळ यांना सोडायचे नाही. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे की नाही ते पहावे लागेल. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, झिरवाळ तृतीयपंथी व्यक्तीला एकदाच भेटले असे नाही, तर त्यांचे असंख्य फोटो आहेत. हे जे पवन यादव आहेत ते प्रत्येकाला भेटायचे. सगळ्या राजकारण्यांबरोबर त्यांचे नेहमीप्रमाणे फोटो आहेत. काही लोक म्हणताहेत की जे झालं ते दोघांच्या मान्यतेनं झालं. हे सगळं शासकीय जागेत केलं गेलं. तिथे दारूच्या बाटल्या दिसत आहेत. हे व्हीडीओ शूटिंग ब्लॅकमेलिंगसाठी केलं गेलं यात शंका नाही. पण आपण करतोय काय याचे भान असणे गरजेचे होते. हे सगळं बघून राजकारण आपण कोणत्या स्थितीला नेतोय याचा महाराष्ट्राने विचार करायला हवा. ही जी घाण चाललीय ती कुठेतरी थांबायला हवी. असे नेते ज्या पक्षात आहेत त्यांच्यासाठी ते लाजीरवाणेच आहे. अशा नेत्यांना तात्काळ राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे आणि त्यांनी तो दिला नाही तर त्यांना काढून टाकलं पाहिजे. झिरवाळ यांचा व्हीडीओ पवन यादव याचा भाऊ रवी यादव याने सार्वजनिक केल्याचे सांगितले जाते.

पवन यादव हा ट्रान्सवूमन असून खंडणी गोळा करण्याचा व्यवसाय करत असल्याचा भावाचा आरोप आहे. पवन यादव याच्याशी संबंधित प्रकरणात इतर काही मंत्र्यांची नावे देखील पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारे शासकीय सुविधांचा गैरवापर केल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे. झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. भोंदू बाबांबरोबर काही लोकांचे जे धार्मिक कनेक्शन होते ते समोर येत आहे असे लक्षात येताच सहा-सात महिन्यांपूर्वी काढून ठेवलेला व्हीडीओ अचानक बाहेर आणला गेला असावा असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी व राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी ही इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती म्हणजे झिरवाळ.

त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये एसीबीचा ट्रॅप लावणे व नंतर त्यांचा जुना व्हीडीओ काढून मीडियाला सोपवणे म्हणजे एका सरळ माणसाला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. हे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत त्याचा छडा लावला पाहिजे असेही मिटकरी म्हणाले. अशोक खरात प्रकरण अंगलट येतंय म्हणून स्वत:वरील लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार आहे. एकूण हे वंगाळ राजकारण आहे! झिरवाळ यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची आणि पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन चर्चा केल्याचे वृत्त आहे. पक्षात सध्या मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक असून, त्या स्पर्धेतूनच झिरवाळ यांना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा राजकीय गोटात रंगू लागली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे झिरवाळ जाहीरपणे म्हणाले होेते. मात्र, आता ही चित्रफीत समोर आल्यानंतर झिरवाळ यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात झिरवाळ यांना राजीनामा द्यावा लागला तर धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्रिपद सोडावे लागणारे झिरवाळ हे पक्षाचे तिसरे मंत्री ठरतील.

दोन महिन्यांपूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. आता ही नवीन चित्रफीत समोर आल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. खरे म्हणजे झिरवाळ यांच्या वैयक्तिक बाबीत नाक खुपसण्याची काहीच गरज नव्हती. विशेष म्हणजे या प्रकरणात त्या तृतीयपंथीने तक्रार केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे झिरवाळांच्या खासगी गोष्टीत धुडगूस घालण्याचे काय कारण? येथे सिने अभिनेता मनोज कुमार ऊर्फ भारत कुमारचे एक गीत आठवते- ‘बस यही अपराध मै हरबार करता हूँ आदमी हूँ आदमीसे प्यार करता हूँ!’ झिरवाळांची कदाचित हीच भावना असेल.