28.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीय विशेषडॉ. आंबेडकरांचे शिक्षणविचार

डॉ. आंबेडकरांचे शिक्षणविचार

  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे किती द्रष्टे होते हे त्यांनी शिक्षणाच्या मांडलेल्या विचारातून सहजतेने लक्षात येईल. भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्या धोरणाने देखील उच्च शिक्षणाचा आलेख उंचावण्यासाठीची भूमिका घेतली आहे. सध्या उच्च शिक्षणात २६ टक्के विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्याचे प्रमाण २०३५ पर्यंत पन्नास टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. राष्ट्राची प्रगती व समाजाची उन्नती साधायची असेल तर उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्या दिशेने बाबासाहेबांनी केलेली मांडणी अधिक महत्त्वाची ठरते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या विविधांगी चिंतनानंतर समाजाच्या उद्धाराचा राजमार्ग हा शिक्षण हाच असल्याचे वारंवार नमूद केले आहे. समाज व राष्ट्र प्रगतीच्या दिशेने घेऊन जायचे असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. व्यक्तीची परिस्थिती आणि समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे दलितांवरील अन्याय संपुष्टात आणायचा असेल तर शिक्षणाची वाट चालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. त्यांनी शिक्षणाचा जो अर्थ जाणला होता तो केवळ अक्षर साक्षरतेपुरता मर्यादित नव्हता. शिक्षणाचा मूलभूत अर्थ त्यांना सापडला होता. आपण ज्या परिस्थितीत जगतो आहोत ते दारिद्र्य, सन्मानहीन जीवन, स्वाभिमानशून्य जगणे हे सारे संपवायचे असेल तर आपली पुढची पिढी शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करायला हवी. विद्या हे शस्त्र आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतल्याशिवाय परिस्थितीत परिवर्तन कसे घडेल हा प्रश्न आहे. पालकांनी आपली मुले क्लार्क, शिक्षक वगैरे झाली पाहिजेत अशी इच्छा धरली पाहिजे. मुलांना शिक्षण देण्यास कसूर करता कामा नये. अर्थात हा विचार जेव्हा प्रतिपादन केला तेव्हा ही स्वप्ने देखील मोठीच होती हे लक्षात घ्यायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला स्वत:च्या उद्धारासाठीचा मंत्र दिला होता त्यातील पहिला मंत्र शिक्षणाचा होता. ते म्हणाले होते शिका, संघटित व्हा, चळवळ करा आणि संघर्ष करा. उत्थानाचा मार्ग शिक्षणाच्या महाद्वारातून जातो असे सांगत नवी पाऊलवाट निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने धडपड केली होती.

डॉ. बाबासाहेबांना शिक्षणाची शक्ती ज्ञात होती. त्यांनी त्यासाठी सातत्याने अभ्यासाचा मार्ग अनुसरण्याची गरज व्यक्त केली होती. त्यांनी विविध सभागृहांत शिक्षणाचा मार्ग दर्जेदार असायला हवा म्हणून भूमिका घेतली होती. त्यासाठी संस्थांची निर्मिती करण्यासाठी आणि सरकारने शिक्षणावरील गुंतवणूक वाढवायला हवी म्हणून मोठा संघर्ष केला आहे. एकदा दारूबंदीसाठी सरकारने अंदाजपत्रकात अधिक खर्च दर्शवला होता. त्याच पत्रकात शिक्षण व आरोग्यावरील खर्च कमी होता. तेव्हा डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणावरील खर्च उंचावण्यासाठी केलेली मांडणी विचार करायला भाग पाडणारी आहे. शिक्षण घेऊन चालणारी माणसं शहाणी बनतील तर अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. मात्र ते शिक्षण साध्यतेने प्राप्त करण्याची गरज डॉ. आंबेडकर अधोरेखित करतात. विद्यार्थी बी. ए. झाला की आपले शिक्षण जणू संपले असेच मानले जाते. अशी धारणा असणा-यांना डॉ. आंबेडकर सांगतात की, बी. ए. झाल्यावर फार तर शिक्षकांशिवाय स्वतंत्रपणे अभ्यास करता येईल. म्हणजे जे शिकायचे आहे ते खरेतर पुढेच असते.

माणसाला जन्मभर शिकायचे असे जरी मनात आले तरी विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल. त्यामुळे जीवनभर ज्ञानाची वाट चालण्याचा सातत्याने प्रयत्न करायला हवा. आज आपले शिक्षण आणि पदव्या वाटणा-या विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी देखील याचा गंभीर विचार करत पेरणी करण्याची गरज आहे. अडाणी मनुष्य कोणास फसवू शकत नाही. फसवावे कसे हेच त्याला उमगत नाही. शिकलेली माणसं कसे फसवावे व कोणास फसवावे या संदर्भात युक्तिवाद करू शकतात. डॉ. आंबेडकर यांनी जो धोका सांगितला होता तो वर्तमानात आपल्या समाजात अधिक स्पष्टपणे दिसत आहे. एकीकडे आपला देश साक्षरतेत नव्वदी गाठतो आहे आणि त्याचवेळी समाजात फसविण्याचे, जुमला करण्याचे, भ्रष्टाचाराचे, मूल्यहीनतेची वाट चालण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. साक्षरता उंचावल्यानंतर न्यायालयाची, पोलिसांची, तुरुंगांची संख्या वाढते आहे. गुन्हेगारीचा आलेखही उंचावतो आहे म्हणजे शिक्षण आणि भ्रष्ट आचरण यांचा काही संबंध आहे हे लक्षात घ्यायला हवे. समाजात सध्या व्हाईट कॉलर गुन्हेगारी उंचावत आहे. विविध मार्गाने फसविण्याचे, भ्रष्टाचाराचे मार्ग शोधले जात आहेत. शोधाची वाट चालणारी सारी माणसं ही दुर्दैवाने अधिक शिकलेली आहेत.

डॉ. बाबासाहेब म्हणायचे की, आपल्याला विद्या हवी आहे पण त्या विद्येला शीलाची जोड हवी. विद्या ही तलवारीसारखी आहे. तिचा उपयोग नेमका कसा करायचा हे त्या व्यक्तीच्या शीलावर अवलंबून असते. सद्विचाराची कास धरणारा माणूस तलवारीचा उपयोग जसा उत्तम करेल त्याप्रमाणे दुर्गुण असेल तर त्याचा उपयोग वाईटासाठीच होईल. शीलयुक्त शिक्षण असेल तर त्यातून ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणाच्या दिशेने होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शीलयुक्त शिक्षणाची वाट चालणारा कोणीही कोणत्याही प्रकारे चुकीच्या कामासाठीचे समर्थन करत आपल्या ज्ञानाचा उपयोग करू शकणार नाही. शीलाशिवाय शिक्षण घेणारी संख्या उंचावत गेली तर समाज, राष्ट्राच्या -हासास आरंभ झाला आहे असे समजावे. शिक्षणापेक्षा अधिक मूल्य कशाचे असेल तर ते शीलाचे आहे. शिक्षणाचा विचार उन्नतीचा असला तरी ती होताना जेव्हा दिसत नाही तेव्हा त्याचे कारण त्या शिक्षणात शीलाचा विचार प्रतिबिंबीत नाही असे समजावे. शिक्षणापेक्षा अधिक मोल शीलाचे आहे. शिकलेल्या माणसांनी केवळ पोटाचा विचार करून चालणार नाही. माणसं नुसती शिकली तर त्यांचा काहीच उपयोग नाही. त्याच्या शिक्षणाचा उपयोग दुस-याच्या उन्नती आणि प्रगतीसाठी होण्याची गरज आहे.

शिक्षणाचा दर्जा देखील अधिक उंचवायला हवा असे सांगताना डॉ. आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांनी अधिक अभ्यास करण्याची गरज आहे असे सातत्याने नमूद केले होते. आपल्याला जगावर अधिराज्य करायचे असेल, आपल्यात आत्मविश्वास दृढवायचा असेल तर अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. मात्र शिक्षणापेक्षा राजकारणात विद्यार्थी जेव्हा दंग होतात तेव्हा तो शैक्षणिक -हास समजायला हवा. विद्यार्थ्यांनी राजकारणापासून अलिप्त राहायला हवे. आज आपल्या देशातील विद्यार्थी संघटना, विद्यापिठीय संघटनांचा विचार केला तर परिस्थिती हाताबाहेर चालली आहे का? याचा संशय येतो. विद्यार्थी शिक्षणापेक्षा राजकारणावर अधिक लक्ष देत आहेत तेव्हा शिक्षणाच्या गुणवत्तेची वाट चालणे अडथळ्याची शर्यत ठरते. याचा अर्थ त्यांचा राजकारणाला विरोध होता असे नाही. मात्र विद्यार्थीदशेत विद्येची साधना अधिक महत्त्वाची आहे हे लक्षात घ्यायला हवे. आपण ज्या परिस्थितीतून आलो आहोत त्याची जाणीव त्यांना सतत होती. ते म्हणतात की, मी विद्यार्थी असताना मंडपाएवढीच आमची छोटीसी खोली होती, तीत आम्ही सर्व कुटुंब राहत होतो. त्यात बहिणीची दोन मुले, एक बकरी, जाते-पाटा, वगैरे आणि मिणमिण जळणारा तेलाचा दिवा. इतकी हलाखीची परिस्थिती असताना मी अभ्यास केला. बाबासाहेबांनी जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता तेव्हा त्यांनी ४० वर्षे भावाचा शर्ट घातला होता. आज शिक्षण मिळते आहे त्यामुळे ते अधिक गुणवत्तेने घेण्याचा आणि त्यासाठी साधना करण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवा.

समाजाच्या उन्नतीचा विचार करताना त्याच्या मुळाशी असलेला प्रश्न आर्थिक आहे असे सांगितले जाते पण ते खरे नाही. दलितांची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या निवा-याची सोय करून पूर्वीप्रमाणे त्यांना उच्च वर्गाची सेवा करण्यास लावणे नव्हे. खालच्या वर्गाची प्रगती ज्यामुळे खुंटली आहे. ज्यामुळे त्यांना दुस-याचे गुलाम व्हावे लागले आहे अशी कारणे त्यांच्यातून नाहिशी करणे महत्त्वाचे आहे. खालच्या वर्गाच्या प्रश्नांच्या मुळाशी असलेली जी कारणे आहेत त्यात त्यांना कारणांची जाणीव करून देण्याची गरज आहे. खालच्या वर्गाच्या प्रश्नांच्या मुळाशी शिक्षणाचा अभाव हेच कारण आहे. डॉ. बाबासाहेब हे किती द्रष्टे होते हे त्यांनी शिक्षणाच्या मांडलेल्या विचारातून सहजतेने लक्षात येईल. भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्या धोरणाने देखील उच्च शिक्षणाचा आलेख उंचावण्यासाठीची भूमिका घेतली आहे. सध्या उच्च शिक्षणात २६ टक्के विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्याचे प्रमाण २०३५ पर्यंत पन्नास टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे.

– संदीप वाकचौरे,
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR