नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील ५ ते ९ वर्षे वयोगटातील एक तृतीयांश मुलांमध्ये ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण जास्त अधिक आहे. विशेषत: पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील राज्यांतील या वयोगटांतील मुलांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक तर महाराष्ट्रात ते १९.१ टक्के आढळले.
ट्रायग्लिसराइड्सचे (रक्तातील चरबीचा एक प्रकार) प्रमाण उच्च पातळीवर असलेल्या मुलांना भविष्यात हृदयविकार होण्याचा धोका असतो. सरकारने ‘चिल्ड्रेन इन इंडिया २०२५’ हा अहवाल तयार केला असून त्यातून ही माहिती समोर आली आहे. हा अहवाल ‘एम्स’च्या वैद्यकिय पथकाने तयार केला आहे.
१६ टक्के मुलांमध्ये प्रमाण अधिक : जन्मावेळी ऑक्सिजनचा अभाव, झालेली दुखापत तसेच न्यूमोनिया या कारणांनी नवजात बालकांचे मृत्यू होतात. तसेच देशात १६% किशोरवयीन मुलांमध्ये ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण जास्त असल्याचेही आढळले आहे.
‘ट्रायग्लिसराइड्स’वर उपाय : साखर, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, शीतपेये यांचे प्रमाण कमी करणे, जास्त कॅलरी टाळून आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करणे, नियमित व्यायाम हा ट्रायग्लिसराइड्स कमी करण्याचा उत्तम उपाय आहे, मद्यपान पूर्णपणे टाळणे अतिशय आवश्यक आहे, मधुमेह व अन्य आजार असल्यास नियमित उपचार करून ते नियंत्रणात ठेवणे.
















