34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रदौंड, इंदापूर सुनेत्रा पवारांच्या पाठीशी?

दौंड, इंदापूर सुनेत्रा पवारांच्या पाठीशी?

दौंड : देशभराचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत जाहीर झाल्यापासून निवडणुकीची चुरस दिवसागणिक वाढताना दिसते आहे. गेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे राहिलेला दौंड, इंदापूर मतदारसंघ यंदा सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभा राहतील, असे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढर्णा­या सुप्रिया सुळे यांना ६ लाख ८६ हजार ७१४ मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात भाजपाच्या कांचन कुल यांना ५ लाख ३० हजार ९४० मते मिळाली होती. सुळे यांनी कुल यांच्यावर १ लाख ५५ हजार ७७४ मतांनी मात केली होती.

तर दौंड विधानसभा मतदारसंघातून कांचन कुल यांना ७ हजार ५३ मतांची आघाडी मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत मात्र या चित्रात बदल होऊ शकतो.
या दोन्ही मतदारसंघांतील मातब्बर यंदा एकत्र आले आहेत. अजित पवारांसह रमेश थोरात, राहुल कुल आणि हर्षवर्धन पाटील यांच्या एकत्र ताकदीमुळे या मतदारसंघांत सुळे यांना जोरदार फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दौंड आणि इंदापूर या दोन्ही मतदारसंघांत सुनेत्रा पवार यांचा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून थेट संपर्क आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघांतून सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. इतर मतदारसंघांतील आकडेवारी पाहता गेल्या निवडणुकीत पुरंदर विधानसभा मतदारसंघात सुळे यांना अवघ्या ९ हजार ६८१ मतांची आघाडी मिळाली होती. तुलनेने शहरी असलेल्या खडकवासला मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या मतदारांच्या माध्यमातून कुल यांनी ६५ हजार ४९४ मतांची आघाडी मिळविली होती.

भाजपाचा हा मतदार या वेळी सुनेत्रा पवार यांना मदत करेल, अशी भक्कम यंत्रणा महायुतीतर्फे उभी करण्यात आली आहे. विकासकामांमुळे अजित पवारांचा गावोगावी असणारा संपर्क, सामाजिक कार्यातून सुनेत्रा पवार यांना मिळणारा जनाधार आणि महायुतीच्या घटकपक्षांतील समर्पित कार्यकर्त्यांची मोठी फौज या जोरावर बारामती लोकसभा मतदारसंघातील या वेळची लढत लक्षवेधी झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR