40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरनिवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तडीपार व स्थानबद्धतेची कारवाई

निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तडीपार व स्थानबद्धतेची कारवाई

सोलापूर: मागील काही दिवसांत शहर पोलिसांनी १२ तर ग्रामीण पोलिसांनी ६१ जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. आता शहर पोलिसांच्या रडारवर जवळपास ६५ तर ग्रामीण पोलिसांच्या यादीवर ८५ जण आहेत.

सोलापूर शहरात सात तर ग्रामीणमध्ये २५ पोलिस ठाणी आहेत. त्याअंतर्गत दरवर्षी १२ ते १४ हजारांपर्यंत गुन्हे दाखल होतात. पण, मुद्देमाल व शरीराविरूद्धच्या गुन्ह्यांची दखल पोलिसांकडून गांभीर्याने घेतली जाते. चोरी, घरफोडी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवून दहशत पसरवणे, धमकी, दमदाटी करून खंडणी मागणे, घातक शस्त्र जवळ बाळगून धमकावणे अशा सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची नजर असते. सण-उत्सव, निवडणूक काळात त्यांच्यावर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील ग्रामीण पोलिसांनी जवळपास साडेनऊ-दहा हजार तर शहर पोलिसांनी दीड हजार सराईत गुन्हेगारांची यादीच तयार केली आहे.

त्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले व ज्यांना वारंवार बजावून देखील किंवा त्यांच्यावर कारवाई होवूनही वर्तनात सुधारणा झाली नाही, त्यांच्यावर तडीपार किंवा स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

गुन्हेगारांच्या टोळ्यांवर कलम ५५ अंतर्गत तडीपारीची कारवाई केली जाते. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मागील काही दिवसांत जिल्ह्यातील पाच टोळ्यांमधील २० संशयित आरोपींवर तडीपारीची कारवाई केली आहे. तर कलम ५६ अंतर्गत गंभीर स्वरुपाचे दोन गुन्हे दाखल असलेल्यांवर तडीपारीची कारवाई केली जाते. तसेच कलम ५७ अंतर्गत देखील ज्यांना न्यायालयातून शिक्षा झाली आहे अशा गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जाते.

ग्रामीण पोलिसांच्या रडारवर जवळपास ८५ तर शहर पोलिसांकडून आणखी ६० ते ६५ जणांवर तडीपारीची कारवाई होवू शकते, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जात आहे. गुन्ह्याचे स्वरुप व समाजातील त्याच्या गुन्हेगारीचा प्रभाव पाहून संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. तरीदेखील त्याने गुन्हे करणे सुरुच ठेवल्यास त्याला पुढे गंभीर परिणाम भोगावे लागतील.असे सोलापूर शहर पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR