38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरअनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून करणाऱ्यास जन्मठेप

अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून करणाऱ्यास जन्मठेप

सोलापूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून करणाऱ्यास जिल्हा न्यायाधीश योगेश राणे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रामहरी ऊर्फ राम शामराव बनसोडे (वय ३४, रा. तेलगाव सिना, ता. उत्तर सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. युवराज निवृत्ती लांडगे (रा. तेलगाव सिना) असे खून झालेल्याचे नाव असून, याबाबत रमेश नागनाथ लांडगे (वय ३२, रा. तेलगाव सिना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रामहरी बनसोडे व युवराज लांडगे हे दोघे एकाच गावातील रहिवासी होते. रामहरी बनसोडे याला युवराज लांडगे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून ८ एप्रिल २०२० रोजी रामहरी बनसोडे याने तेलगाव ते कंदलगाव जाणाऱ्या रोडवर युवराज लांडगे याचा दगडाने व चाकूने मारून खून केला होता.या प्रकरणी रमेश लांडगे यांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपी रामहरी बनसोडे यास अटक केली.

तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक डी. एस. दळवी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले. याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश योगेश राणे यांच्यासमोर झाली.या प्रकरणी सरकारच्या वतीने ११ साक्षीदार तपासण्यात आले. नेत्र साक्षीदार व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्रा धरून न्यायाधीश राणे यांनी आरोपी रामहरी बनसोडे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.या प्रकरणी सरकारच्या वतीने अ‍ॅड. माधुरी देशपांडे यांनी तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. शिव झुरळे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस कर्मचारी रंजना जमादार यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR