37 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रात प्रतिष्ठेच्या लढतींना रंगत!

पश्चिम महाराष्ट्रात प्रतिष्ठेच्या लढतींना रंगत!

ज्येष्ठांचे अनुभव पणाला लढतीत बंडाचीही झालर

पुणे : लोकसभेच्या तिस-या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील दहापैकी सात मतदारसंघांत येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. अर्ज माघारीचा दिवस संपताच चित्र स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीकडे सातपैकी पाच खासदार आहेत. (भाजप ३ तर शिंदेसेना २) महाविकास आघाडीकडे बारामती आणि सातारा या ठिकाणीच राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) खासदार आहेत. काँग्रेसचा एकही खासदार नाही. भाजपने चार, शिंदेसेना दोन तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकाच जागेवर लढत आहेत. अजित पवार गटाकडे एकही खासदार नाही आणि त्यांना बारामतीची एकमेव जागा मिळाली आहे.

दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला पक्षफुटीने तडे गेले असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या पाच दशकांच्या राजकीय अनुभवाच्या जोरावर जोडण्या लावल्याने पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांत प्रतिष्ठेच्या तुल्यबळ लढती रंगणार आहेत. काँग्रेसने कोल्हापुरात शाहू छत्रपती तर सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांना उतरविले आहे. सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्याने भाजपसमोर उद्धवसेनेचे आव्हान नव्हते, मात्र, काँग्रेसचे विशाल पाटील यांनी आघाडीविरुद्ध बंड केल्याने मुख्य लढत तेच देतील असे वातावरण आहे. सोलापुरात भाजपचे राम सातपुते यांचे आव्हान असले तरी प्रणिती शिंदे गेल्या तीन महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार त्यांच्यासाठी जोडण्या लावत आहेत.

माढाची लढत चुरशीची
माढा मतदारसंघात भाजपसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक सध्या चुरशीची झाली आहे. भाजपमध्ये असणा-या अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारीवर रिंगणात उतरले आहेत शिवाय माजी मंत्री, फलटणचे रामराजे निंबाळकर यांनी बंडाचे निशाण हाती घेतल्याने माढ्याची लढत चुरशीची होणार आहे.

बारामतीत पवार विरुध्द पवार
बारामती आणि साता-यात शरद पवार विरूद्ध अजित पवार अशीच लढत महाराष्ट्राला पाहायला मिळणार होती. मात्र, सातारची जागा भाजपने उदयनराजे यांच्यासाठी प्रतिष्ठेची करून घेतली ते राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादीकडून गत निवडणुकीत विजय मिळविला होता. मात्र, राजीनामा देऊन भाजपकडून लढले त्यात त्यांचा पराभव झाला. भाजप आणि अजित पवार गटाच्या निर्णयाकडे पाहत आमदार शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांनी मैदानात उतरविले आहे.

सांगलीत बंड
सांगली मतदारसंघ हा वसंतदादा पाटील यांच्या नावाने ओळखला जातो. काँग्रेस येथून नेहमीच लढत आली आहे. मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस विरोधकांच्या अडथळ्याने उद्धवसेनेला सोडण्यात आली. महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या नवख्या राजकीय कार्यकर्त्यास उमेदवारी दिल्याने भाजपसाठी ही लढत एकतर्फी होती, पण वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी बंड केल्याने सा-या महाराष्ट्राचे आता लक्ष या लढतीकडे लागले आहे.

कोल्हापूरही चर्चेत
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांची निर्णायक ताकद असल्याने महाविकास आघाडीला उमेदवार देताना दमछाक झाली. शेट्टी यांनी शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढण्यास नकार दिल्याने माजी आमदार सत्यजित पाटील यांना उद्धवसेनेने रिंगणात उतरविल्याने ही लढत तिरंगी होणार आहे. राजू शेट्टी यांच्यामुळे आघाडी आणि युतीची दमछाक होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR