37 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeधाराशिवमहायुती-महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच

महायुती-महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच

धाराशिव : मच्छिंद्र्र कदम
१८ व्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे, एकीकडे उन्हाचा पारा सुरु असताना दुसरीकडे निवडणूकीचा आखाडा पेटला आहे. यामध्ये धाराशिव लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी विरुध्द महायुती यांच्यामधील आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण तापले असून दोघांमध्ये तगडी फाईट होताना दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि.२४) तुळजापूर येथे शरद पवारांची सभा झाली. तर महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी (दि.३०) धाराशिव येथे येत आहेत. ते काय बोलणार याकडे लक्ष लागले असून प्रचाराच्या जसजश्या तोफा धडाडत आहेत, त्यानुसार या मतदार संघातील वातावरण टाईट होताना दिसून येत आहेत.

धाराशिव लोकसभा मतदार संघात महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना, विश्व शक्ती पार्टी आदी पक्षासह ३१ जणांनी आपले उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराकडून आपल्याकडे मतदान खेचून घेण्यासाठी आपआपल्या नेत्यांच्या सभा मतदार संघात ठेवल्या आहेत. बुधवारी (दि.२४) तुळजापूर येथे शरद पवार यांची सभा झाली. त्यांनी केंद्र व राज्य सरकारसह महायुती उमेदवार व पद्मसिंह पाटील यांच्या कुटूंबावर जोरदार टिका केली. त्यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी (दि.३०) धाराशिव येथे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. त्या सभेची तयारीही जोरात सुरु आहे. याशिवाय येत्या काही दिवसात महायुती, महाविकास आघाडीस वंचितच्या दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहे.

धाराशिव लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महायुतीकडून अर्चना पाटील तर वंचितकडून भाउसाहेब आंधळकर हे निवडणूक रिंगणात आहेत. वंचितची मतदार संघात अद्यापतरी एकही प्रचार सभा झालेली नाही. याउलट महाविकास आघाडी व महायुती यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करुन उमेदवारी दाखल केले. त्यानंतर मतदार संघात त्यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु आहे. एकमेकांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाविकास आघाडी विरुध्द महायुती असाच सामना होण्याचे चित्र दिसून येत आहे. या दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचारार्थ आनखी वरिष्ठ नेत्यांच्या सभांचे नियोजन केले आहे. आजपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेसचे नेते तथा माजी मंत्री अमित विलासराव देशमुख, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची तुळजापूर येथे सभा झाली.

शिवाय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री अमित देशमुख यांची आनखी सभा होणार आहेत. तर महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी धाराशिव येथे सभा होते आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री धनंजय मुंढे, पंकजा मुंढे, बाबा सिध्दीकी आदींच्या सभा होणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाउसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या तीन सभा धाराशिव, कळंब व बार्शी येथे होणार आहेत. त्यामुळे मतदार संघातील होणा-या या सभेमुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होणार असून राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. प्रत्यक्षात याचा फायदा कोणाला होणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र मतदार संघात प्रचारात आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय रंगत वाढली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR