38.9 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरप्रणिती शिंदेंनी नामदेव पायरीवर फोडला प्रचाराचा नारळ

प्रणिती शिंदेंनी नामदेव पायरीवर फोडला प्रचाराचा नारळ

सोलापूर : सातत्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवामुळे आता काँग्रेसने मंदिराकडे धाव घेतली असून आज प्रणिती शिंदे यांनी विठ्ठल मंदिरात देवदर्शन घेतले . यानंतर नामदेव पायरी येथे महाविकास आघाडीच्या सहका-यांसोबत नामदेव पायरी येथे प्रचाराचा नारळ फोडला.

यापूर्वीही सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्येकवेळी आपला उमेदवारी अर्ज विठ्ठलाच्या पायावर ठेवून मग उमेदवारी दाखल केली होती . आता उद्या प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यापूर्वी मतदारसंघातील ७ मंदिरात नारळ फोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची सुरुवात विठ्ठल मंदिरापासून केली असून यानंतर मार्डी येथील यमाई माता, बाळे येथील खंडोबा, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ , हत्तूर येथील सोमेश्वर, सोलापूर येथील मार्कंडेय, सिद्धेश्वर मंदिर आणि राम मंदिरात आज प्रणिती शिंदे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

गेल्या तीन निवडणुकात सोलापूर मतदारसंघातील हिंदुत्ववादी मतदारांनी काँग्रेसचा पराभव केल्याने यावेळी प्रणिती शिंदे या देवांच्या साक्षीने प्रचाराचा नारळ फोडत निघाल्या आहेत. आपण महिन्याला येऊन विठ्ठलाचे दर्शन घेत असतो , दर्शन घेतल्यावर खूप समाधान मिळते आणि कृतज्ञानेची भावना असते . आजवर मला खूप दिले पण यावेळी शेतकरी , गोरगरीब जनता संकटात आहे , तीव्र पाणी टंचाईने नागरिक त्रस्त असताना महाराष्ट्राला योग्य त्या माणसांच्या हातात दिले म्हणजे शेतकरी हित साधता येईल असे साकडे घातल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , सुशीलकुमार शिंदे आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेते व पदाधिका-यांसह उद्या सकाळी सडे नऊ वाजता काँग्रेस कमिटीपासून रॅली निघणार आहे. चार हुतात्मे , आंबेडकर पुतळा , महात्मा गांधी पुतळा , शिवाजी महाराज पुतळा येथून साडे दहा ते अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR