38.3 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयप्रज्ञावंत शास्त्रज्ञ!

प्रज्ञावंत शास्त्रज्ञ!

विश्वनिर्मितीचे गूढ हा मानवजातीसाठी कायमच उत्सुकतेचा विषय राहिला आहे. साहजिकच विज्ञानालाही हे गूढ कायम खुणावत राहिले आहे. हे गूढ उकलण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा ठरलेल्या हिग्ज बोसॉन अर्थात गॉड पार्टिकल म्हणजेच प्रचलित भाषेत ‘देवकणा’च्या अस्तित्वाबद्दल सर्वप्रथम शास्त्रीय सिद्धांत मांडणा-या पीटर हिग्ज यांच्या निधनाने भौतिकशास्त्रातील एका प्रज्ञावंत शास्त्रज्ञानाच्या पर्वाची अखेर झाली. या सृष्टीचा कर्ताधर्ता कोण? विश्वाचा हा प्रचंड पसारा कोण व कसा चालवतो? या अथांग विश्वाची सुरुवात व शेवट कुठे आहे? पृथ्वीवरील वा ब्रह्मांडातील सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा अर्थ काय? अशा कितीतरी अनुत्तरित प्रश्नांनी मानवजातीला हजारो वर्षांपासून ग्रासले आहे. पीटर हिग्ज यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून या गूढ प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा अथक प्रयत्न केला. या प्रयत्नातून १९६० साली त्यांनी प्रथम ‘देवकणा’च्या अस्तित्वाबद्दल दावा केला.

मात्र, हा दावा शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होण्यासाठी तब्बल पाच दशकांच्या प्रदीर्घ कालावधीची प्रतीक्षाच करावी लागली. याबाबतच्या संशोधनासाठी स्वित्झर्लंडमध्ये युरोपियन कॉन्सिल फॉर न्यूक्लिअर रिसर्च (सर्न) या संस्थेत संशोधनासाठी भव्य यंत्रणा उभारण्यात आली. जमिनीच्या पोटात खोलवर उभारलेल्या लार्ज हायड्रॉन कोलायडर या प्रयोगात शेकडो शास्त्रज्ञ रात्रंदिवस कार्यरत राहिल्यावर अखेर ४ जुलै २०१२ रोजी देवकणांचे अस्तित्व सिद्ध झाले. २०१३ मध्ये पीटर हिग्ज यांना या शोधाबद्दल भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्यासाठी मांडल्या गेलेल्या सिद्धांतापैकी महास्फोटाच्या सिद्धांताला सर्वाधिक मान्यता आहे. सुमारे १३७० कोटी वर्षांपूर्वी झालेल्या महास्फोटामध्ये तयार झालेल्या अदृश्य क्षेत्रामध्ये हिग्ज बोसॉन कणांचे म्हणजे देवकणांचे अस्तित्व जाणवले होते. या कणांवर पीटर हिग्ज यांच्यासह सहा वैज्ञानिकांनी संशोधन केले. मात्र, या देवकणांचे अस्तित्व त्यांना सिद्ध करता आले नव्हते. भारतीय वैज्ञानिक सत्येंद्रनाथ बोस यांनी १९२४ मध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, फोटॉन आदी कणांच्या समूहांचे संख्याशास्त्रीय नियम शोधून काढले होते.

त्यांच्या या संशोधनाच्या जोरावरच साठच्या दशकात इलेक्ट्रॉनपेक्षाही सूक्ष्म कणांचा शोध लागू शकला होता. याच संशोधनाचा मुख्य आधार पीटर हिग्ज यांनी देवकणांच्या सिद्धांतासाठी घेतला. त्यावरूनच या कणांना हिग्ज-बोसॉन असे शास्त्रीय नाव प्रदान करण्यात आले. हा देवकण वस्तुमान प्रदान करतो, असा सिद्धांत हिग्ज यांनी १९६४ मध्ये मांडला. या जगात निर्वात, अस्तित्वहीन असे काहीच नाही. जेथे काही नाही असे आपल्याला वाटते तेथेही एक विशिष्ट क्षेत्र असतेच. त्याला ‘हिग्ज फिल्ड’ असे संबोधले जाते. हिग्ज यांचा हा सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाला तेव्हा या प्रयोगाचे सारे श्रेय हिग्ज यांनी तरुण संशोधकांना दिले होते. पीटर हिग्ज यांचा जन्म इंग्लंडमधील न्यू कॅसल इथला. १९२९ मध्ये ते साऊंड इंजिनीअर असणा-या पित्याच्या घरात जन्मले. त्यांचे बहुतांश शालेय शिक्षण ब्रिस्टलमध्ये झाले. १९४१ ते ४६ या काळात कोथम ग्रामर स्कूलमध्ये त्यांना मिळालेले शिक्षण त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. ‘क्वांटम मेकॅनिक्स’चे पितामह पॉल डॅरेक या शाळेचे माजी विद्यार्थी! पीटर हिग्ज यांना त्यांच्यापासून भौतिकशास्त्राच्या अभ्यासाची प्रेरणा मिळाली. सैद्धांतिक भौतिकशास्त्रात त्यांना विशेष रुची होती.

वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी सिटी ऑफ लंडन स्कूलमध्ये गणितात विशेष प्रावीण्य प्राप्त केले आणि प्रतिष्ठित किंग्ज कॉलेज लंडनमध्ये प्रवेश घेतला. तिथूनच त्यांनी भौतिकशास्त्राची पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. रॉयल कमिशनकडून त्यांना रिसर्च फेलोशिप देण्यात आली. इम्पिरियल कॉलेज लंडन आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे विविध पदे भूषवून १९६० मध्ये ते एडिंबरो विद्यापीठात परत आले. त्यांचे सर्व महत्त्वाचे संशोधन याच विद्यापीठात घडले. भौतिकशास्त्रातल्या अनेक महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ‘देवकणां’च्या त्यांच्या सिद्धांतावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार २०१३ मध्ये जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर होण्यास झालेल्या उशिराबद्दल खंत व्यक्त करताना त्यांनी अत्यंत मिश्किल प्रतिक्रिया दिली होती. ‘१९८० मध्ये एका स्विडीश मित्राचा मला पुरस्कार मिळाल्याबद्दल फोन आला होता, तेव्हापासून मी पुरस्काराची प्रतीक्षाच करतोय,’ अशी टिप्पणी त्यांनी केली होती.

अणुकेंद्रामधील कणांबाबत भौतिकशास्त्रात ‘स्टँडर्ड मॉडेल’ आहे. देवकणांच्या अस्तित्वाची सिद्धता झाली नसती तर हे मॉडेलच चुकीचे ठरले असते. स्वत: नास्तिक असलेल्या पीटर हिग्ज यांना गॉड पार्टिकल हे नाव अजिबात रुचणारे नव्हते. मात्र, त्यांच्या सिद्धांतावर वैज्ञानिक सिद्धतेची मोहर लागल्यावर वैज्ञानिकांनी त्यांचा भव्य सत्कार केल्यावर त्यांच्या रुद्ध कंठातून बाहेर पडलेले पहिले शब्द ‘ओह माय गॉड’ हे होते. पीटर हिग्ज यांची आणखी एक खासियत म्हणजे ते केवळ प्रयोगशाळेत रमणारे वैज्ञानिक नव्हते. त्यांच्या सामाजिक जाणिवाही अत्यंत प्रखर होत्या. विद्यापीठात शिक्षक संघटनांच्या आंदोलनात ते आघाडीवर असायचे. लंडन आणि नंतर एडिंबरोमध्ये असताना अण्वस्त्रविरोधी मोहीम ‘सीएनडी’चे ते सक्रिय कार्यकर्ते होते. मात्र, या समूहाने पुढे थेट अणुऊर्जेला विरोध करण्याची भूमिका घेतल्यावर त्यांनी या समूहाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन टाकला होता. जनुकीयरीत्या बदल घडवून केलेल्या प्रयोगांना विरोध केल्याने त्यांनी ‘ग्रीन पीस’चे सदस्यत्वही तडकाफडकी सोडले होते. विज्ञानाचा योग्य अर्थ लावून काळाच्या पुढचे पाहणारा हा प्रज्ञावंत संशोधक होता.

त्यांना भौतिकशास्त्रातील वूल्फ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते व पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा जेरूसलेममध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, इस्रायल पॅलेस्टिनी नागरिकांना देत असलेल्या वागणुकीचा निषेध म्हणून त्यांनी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्यास स्पष्ट नकार कळवला होता. पीटर हिग्ज यांनी विश्वनिर्मितीच्या शोध प्रवासातील एक महत्त्वाची रीत आपल्या सिद्धांताने शोधून काढली. त्या वाटेवरून पुढे जात हा शोध निरंतर सुरूच राहील. हे देवकण कुणी निर्मिले याचा शोध आता वैज्ञानिक घेत आहेत व या कणांची निर्मिती प्रयोगशाळेत करता येईल का? याचाही प्रयत्न सुरू आहे. त्यात यश आले तर अवघ्या विश्वाला नव्याने पालाण घालायला मानवप्राणी सज्ज होईल हे निश्चित! प्रखर वैज्ञानिक जाणिवा ठेवून ठोस भूमिका घेणा-या या प्रज्ञावंत शास्त्रज्ञाच्या जाण्याने भौतिकशास्त्राच्या विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या प्रज्ञावंत शास्त्रज्ञाला एकमत परिवाराची मन:पूर्वक विनम्र आदरांजली!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR