30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeनांदेडभाजपला विजयाचा विश्वास तर काँग्रेसला विरोधी लाटेचा आधार!

भाजपला विजयाचा विश्वास तर काँग्रेसला विरोधी लाटेचा आधार!

नांदेड लोकसभा मतदारसंघातील चित्र

 चारुदत्त चौधरी

नांदेड : प्रतिनिधी
मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्यादृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजप विरूद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचलेला आहे. तरी कोणाचे पारडे जड याचा अंदाज वर्तविणे कठीण आहे. भाजपकडून खा.प्रताप पाटील चिखलीकर दुस-यांदा विजयी होणार असा दावा करीत आहेत.

मतदारांच्या मतांवर आमचा विश्वास आहे आणि आमचा विजय निश्चित आहे, असे ते सांगत आहेत तर सत्ताधारीविरोधी वातावरणामुळे आम्हीच जिंकणार व विरोधाची लाट मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विरोधी लाटेच्या आधारावर आमचा विजय होईल, असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार माजी आ.वसंतराव चव्हाण यांना आहे. तर वंचितकडून उच्चशिक्षित अविनाश भोसीकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुरुवातीला ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी दाखल केली परंतु नंतर वंचितने त्यांना उमेदवारी दिली. वंचितकडून मुस्लिम अथवा मागासवर्गीय उमेदवार अपेक्षित होता. भोसीकर यांची वर्णी लागल्यामुळे वंचितचा प्रभाव पडतो की नाही, अशी साशंकता व्यक्त केली जात आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. केवळ तीन उमेदवारांत खरी लढत रंगणार असल्याचे सांगितले जात असले तरी मुळात काँग्रेस आणि भाजपात ही लढत अटीतटीची राहणार आहे. भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे दुस-यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. एकवेळा मोदी लाटेत व अशोकराव चव्हाणांविषयी असलेली नाराजी यामुळे त्यांचा २०१९ मध्ये विजय झाला. तरीदेखील यावेळी तिकिटासाठी शेवटपर्यंत वाट पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.

त्यांच्याच पक्षातील अनेकांनी उमेदवारी मागितल्याने त्यासाठी चांगलीच रस्सीखेच झाली. यंदा त्यांना सत्ताविरोधी वातावरणात फटका बसण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात आली होती. परंतु राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करून संपूर्ण राज्यासह नांदेडच्या राजकारणालाही चांगलीच कलाटणी दिली. त्यांच्या प्रवेशामुळे नांदेडचे राजकीय समीकरण पूर्णत: बदलले आणि चिखलीकरांचे पारडे जड झाले, असे सांगितल्या जात आहे. रेल्वे, राष्ट्रीय मार्ग, रेल्वे विद्युत जोडणी, नांदेड रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण, विमानतळाचा प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग, अंतर्गत रस्ते यासह विविध विकास कामे पक्ष संघटन आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रचारासाठी उतरलेली नेत्यांची फळी ही त्यांची जमेची बाजू आहे.

काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माजी आ.वसंतराव चव्हाण यांच्याकडे १५ वर्षाचा राजकीय अनुभव आहे. सरपंच ते आमदार असा त्यांचा आलेख राहिला आहे. ते नायगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गेल्या काही वर्षांपासून नांदेड जिल्हा काँग्रेसमध्ये ते सक्रिय आहेत. दोनवेळा आमदारकीनंतर प्रथमच ते लोकसभेसाठी उभे आहेत. नांदेड जिल्ह्यात ३ लाख ४० हजार मुस्लिम बांधवांचे मतदान आहे. त्याचप्रमाणे हिंदू मतेदेखील त्यांना मिळतील, अशी अपेक्षा ते करीत आहेत. तर प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधाची लाट आपल्याला चांगलाच आधार देईल. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. विशेषत: भोकर विधानसभा मतदारसंघ त्यांच्या विरोधात काम करीत असल्याचे उघडपणे दिसत आहे.

याच विरोधाचा फायदा वसंतराव निश्चितच उचलतील, असे राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे. काँग्रेसने नवा चेहरा म्हणून वसंतराव चव्हाण यांना पुढे आणले आहे. गेल्या आठ दिवसात त्यांनी लोकसभा क्षेत्र पिंजून काढला असल्याने त्यांच्याबद्दल सहानूभुती निर्माण झाली आहे. सोबतच काही जुने नेते त्यांनी घेतले आहेत. त्याचादेखील फायदा त्यांना होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत खरी लढत राहणार आहे. त्यांनी अद्यापही मोठे चेहरे प्रचारासाठी आणले नाहीत. परंतु भविष्यात राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा प्रियंका गांधी हे प्रचाराला येतील, असे सांगितले जात आहे. प्रचारादरम्यान राष्ट्रीय मुद्यांऐवजी स्थानिक मुद्यांना अधिक प्राधान्य देण्यात येत असल्याने नांदेडकरांची त्यांच्याकडे ओढ निर्माण झाली आहे.

वंचितचे अविनाश भोसीकर हे उच्चशिक्षित असून चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तरूण उमेदवार म्हणून त्यांची निवड झाली असली तरी वंचितकडून मुस्लिम अथवा मागासवर्गीय चेहरा पुढे आला असता तर यदाकदाचित तिरंगी लढत झाली असती. भोसीकर हे दिवसरात्र लोकसभा कार्यक्षेत्रात फिरत आहेत. त्यांना युवकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यांची बहारदार भाषणेदेखील चांगलीच गाजत आहेत. राजकीय मंडळींनी केलेले कारनामे जाहीरपणे ते आपल्या भाषणात मांडत आहेत. यासंदर्भात ते पुरावेदेखील सादर करण्यास तयार आहेत. दोन उमेदवारांपेक्षा मी कसा सरस आहे, हेदेखील ते विश्वासाने सांगत आहेत. एकंदरीत नांदेड जिल्ह्यात दुहेरी लढत असली तरी शेवटच्या क्षणी वंचितकडे पारडे झुकले तर ही निवडणूक तिहेरी होण्याची शक्यता आहे.

१९५१ आणि १९५७ या दोन निवडणुकीमध्ये जिल्ह्यातून दोन्ही वेळेस प्रत्येकी दोन खासदार निवडण्यात आले. या जिल्ह्याने आत्तापर्यंत २० खासदार दिले आहेत. त्यापैकी १५ खासदार हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून विजयी झाले आहेत. दोन वेळा शेतकरी कामगार पक्ष, एक वेळ जनता आणि दोन वेळा भाजपला मतदारांनी संधी दिली आहे. इतिहासाचे आकडे पाहिले तर मतदारसंघावर काँग्रेसचा पगडा असल्याचे स्पष्ट होते. शंकरराव श्रीनिवास (१९५१), देवराव नामदेवराव (१९५१), देवराव नामदेव कांबळे (१९५७), हरिहरराव सोनुले (१९५७), सुभान तुळशीदास जाधव (१९६२), व्यंकटराव तरोडेकर (१९६७), व्यंकटराव तरोडेकर (१९७१), केशवराव शंकरराव धोंडगे (१९७७), शंकरराव भाऊराव चव्हाण (१९८०), शंकरराव भाऊराव चव्हाण (१९८४), अशोक शंकरराव चव्हाण (१९८७), व्यंकटेश रुक्माजी काब्दे (१९८९), सूर्यकांता पाटील (१९९१), गंगाधरराव कुंटूरकर (१९९६), भास्करराव पाटील खतगावकर (१९९८), भास्करराव पा. खतगावकर (१९९९), डी.बी. पाटील (२००४), भास्करराव खतगावकर (२००९), अशोक शंकरराव चव्हाण (२०१४), प्रताप पाटील चिखलीकर (२०१९)

नांदेड जिल्ह्यात एकूण ९ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा नांदेड लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. यात ८६-नांदेड उत्तर, ८७-नांदेड दक्षिण, ८५-भोकर, ८९-नायगाव, ९०-देगलूर, ९१-मुखेड.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR