40.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeपरभणीमहायुतीच्या जानकरांसाठी चार देशमुख मैदानात

महायुतीच्या जानकरांसाठी चार देशमुख मैदानात

प्रवीण चौधरी
परभणी : प्रतिनिधी
परभणी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीने आता चांगलाच वेग पकडला आहे. त्यामुळे राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ शहरातील देशमुख परीवारातील चार दिग्गज नेते महायुतीकडून प्रचाराच्या मैदानात उतरले असून जानकर यांच्या विजयासाठी परभणी शहरातील प्रत्येक भाग पिंजून काढत आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे महानगराध्यक्ष असलेल्या या देशमुखांमुळे महायुतीचे उमेदवार जानकर यांना परभणी शहरातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे महानगराध्यक्ष असलेले प्रताप देशमुख यांनी परभणी शहराचा पहिला महापौर होण्याचा मान मिळवलेला आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणण्यात यश मिळवले होते. याशिवाय शहरातील मुख्य मार्ग असलेल्या रेल्वे स्टेशन ते शिवाजी चौक पर्यंतचा रस्ता त्यांच्याच काळात संपूर्णत: सिमेंटचा तयार करण्यात आला. सर्वांना सोबत घेवून चालणारे नेतृत्व म्हणून प्रताप देशमुख यांची ओळख असून अनेक नगरसेवक त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे परभणी शहराच्या महापालिका राजकारणात प्रताप देशमुख यांचा दबदबा पहावयास मिळतो.

शिवसेना शिंदे गटाचे महानगराध्यक्ष प्रविण देशमुख यांनी गेल्या कित्येक वर्षापासून परभणी शहरातील बायपास रस्त्यासाठी लढा दिला. शासन दरबारी त्यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे आज परभणी शहरातील बा वळण रस्त्याचे काम सुरू झाले आहे. भविष्यात या बा वळण रस्त्यामुळे मोठ्या वाहनांच्या वर्दळीचा शहरावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय शहरातील अनेक वार्डाच्या विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून प्रविण देशमुख यांनी विकास कामांसाठी मोठा निधी खेचून आणलेला आहे. त्यामुळे प्रविण देशमुख हे लोकप्रिय नेतृत्व आहेत.

रासपचे महानगराध्यक्ष असलेले सचिन देशमुख यांनी महापालिकेत माजी सभापती म्हणून भरीव कामगिरी केली आहे. तसेच परभणी शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेच्या नळ जोडणीसाठी परभणीकरांना मोठ्या प्रमाणात आकारण्यात आलेल्या कर आकारणीच्या विरोधात जनआंदोलन पुकारले. या जनआंदोलनामुळे महापालिकेला नवीनळजोडणीची ही रक्कम अर्ध्यावरच आणावी लागली. त्यामुळे परभणीकरांचे हजारो रूपये वाचले. याशिवाय स्वत:च्या वार्डासह संपूर्ण परभणी शहरातील कुठल्याही नागरीकांच्या अडचणीच्या प्रसंगी धावून जाणारे म्हणून सचिन देशमुख यांची ओळख आहे.

भाजपचे महानगराध्यक्ष असलेले राजेश देशमुख हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कुंभकर्ण टाकळी सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. सध्या ते भाजपा परभणी महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. भाजपाच्या संघटना कार्यासह बुथ बांधणीसाठी ते दिवस रात्र काम करीत आहेत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा असून भाजपची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यात त्यांचे मोठे कार्य राहिलेले आहे.

वेगवेगळ्या पक्षाचे महानगराध्यक्ष म्हणून भरीव कामगिरी असलेले देशमुख परीवारातील हे चारही दिग्गज नेते महायुतीचे महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले असल्यामुळे परभणी शहरातून महायुतीचे जानकर यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR