38.8 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडारसेलच्या खेळीमुळे ख्रिस गेलचा विक्रम मोडला

रसेलच्या खेळीमुळे ख्रिस गेलचा विक्रम मोडला

नवी दिल्ली : आयपीएलच्या १७ व्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) पहिला सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात केकेआरचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याने झंझावाती खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या काळात त्याने आयपीएलमध्ये षटकारांचे द्विशतकही पूर्ण केले. ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढत रसेल आयपीएलमध्ये सर्वांत जलद २०० षटकार पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. रसेलने सनरायझर्स हैदराबादविरुध्द २५ चेंडूत ६४ धावांची नाबाद खेळी केली. तर शेवटच्या षटकात हर्षित राणाच्या चमकदार कामगिरीमुळे कोलकाताने हैदराबादचा चार धावांनी पराभव करून आयपीएल २०२४ च्या मोसमाची विजयी सुरुवात केली.

रसेलने आयपीएलमध्ये ९७ डावांत २०० षटकार मारण्याचा पराक्रम पूर्ण केला आहे. तर गेलने १४१ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. चेंडूंच्या बाबतीतही रसेल गेलच्या पुढे आहे.

रसेलने षटकारांचे द्विशतक पूर्ण करण्यासाठी १३२२ चेंडू खेळले, तर गेलने १८११ चेंडूंमध्ये आयपीएलमध्ये २०० षटकार मारण्याचा पराक्रम पूर्ण केला होता. दरम्यान रसेल आणि गेल हे वेस्ट इंडिजच्या संघात एकत्र खेळले आहेत. तर गेल आएपीएलमध्ये केकेआरकडूनही खेळला आहे. या यादीत तिस-या स्थानावर वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड आहे, त्याने आयपीएलमध्ये पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. पोलार्डने २०५५ चेंडूत खेळून आयपीएलमध्ये २०० षटकार मारण्याचा पराक्रम केला होता.

आयपीएलमध्ये सर्वांत जलद २०० षटकार पूर्ण करणारे खेळाडू

खेळाडू चेंडू

१. आंद्रे रसेल १३२२
२. ख्रिस गेल १८११
३. किरॉन पोलार्ड २०५५
४. अब डीव्हिलियर्स २७९०
५. महेंद्रसिंग धोनी ३१२६
६. रोहित शर्मा ३७९८

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR