37.7 C
Latur
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रविठ्ठल कारखान्याचे साखरेचे गोडावून सील

विठ्ठल कारखान्याचे साखरेचे गोडावून सील

चेअरमन अभिजित पाटील यांना धक्का, सूडबुद्धीने कारवाई?
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते, साखरसम्राट अभिजीत पाटील प्रचारात व्यस्त असताना त्यांच्या विठ्ठल साखर कारखान्यातील सुमारे लाखभर साखर पोत्यांचा साठा बँकेने जप्त केला. शिखर बँकेच्या अधिका-यांनी ही कारवाई केली. अधिका-यांची कारवाई सुरू असताना अभिजीत पाटील हे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या माढा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते यांच्या प्रचारसभेत होते. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली. भाजपकडून आधीच सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप होत आहे. त्यातच ही कारवाई करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे गोडाऊन सील करण्याचे काम शिखर बँकेने केल्याने खळबळ उडाली आहे. विठ्ठल कारखान्याकडे शिखर बँकेचे जवळपास ५०० कोटी रुपये थकीत असून याबाबत २०२१ पासून कारवाई सुरु होती. आता कारखान्याचे गोदाम सील करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून अभिजीत पाटील यांनी न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.

पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर दोन वर्षांपूर्वी पूर्वीचे सत्ताधारी भगीरथ भालके यांचा पराभव करून अभिजित पाटील यांनी हा कारखाना जिंकला होता. पहिल्या वर्षी ७ लाख ८० हजार तर दुस-या वर्षी १० लाख ८५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करीत अभिजित पाटील यांनी बँकेचे जवळपास ३५ कोटी रुपये फेडले होते. काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा शिखर बँकेने कारवाईचा बडगा उचलल्यावर पाटील यांनी न्यायालयातून कालपर्यंत स्थगिती आदेश मिळवला होता.

शिखर बँकेच्या टीमची कारवाई
आज सकाळीच शिखर बँकेची टीम पोलिसांसह कारखाना कार्यस्थळावर कारवाईसाठी दाखल झाली. यावेळी अभिजित पाटील शरद पवार यांच्या करमाळा येथील सभेत होते. आमदार रोहित पवार यांनी तेथील भाषणातून अभिजित पाटील यांच्या कारखान्यावर कारवाईला सुरुवात झाल्याचे सांगताच पाटील तडकाफडकी कार्यक्रम सोडून कारखान्यावर पोचले. मात्र, तोपर्यंत अधिका-यांनी कारखान्याची ३ गोदाम सील केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR