30.7 C
Latur
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात दुस-या टप्प्यातही मतदानाचा टक्का घसरला

राज्यात दुस-या टप्प्यातही मतदानाचा टक्का घसरला

राज्यात ५३.७० टक्के मतदान, मतदारांत निरुत्साह असल्याने चिंता
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक २०२४ च्या दुस-या टप्प्यासाठी आज २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले. या टप्प्यात देशातील १३ राज्यातील ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. ज्यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि केरळ आदी राज्यांचा समावेश होता. त्रिपुरातील एका जागेवर सर्वाधिक ६६.९७ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील ८ जागांवर ५३.७० टक्के इतके कमी मतदान झाले. देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची विशेषत: सत्ताधारी पक्षाची चिंता वाढली आहे.
मागच्या तुलनेत दुस-या टप्प्यातही मतदानाची टक्केवारी घसरल्याने चिंता वाढली आहे. एकीकडे मतदान वाढविण्यासाठी जागृती होत असताना मतदारांमध्ये अजूनही उदासीनता असल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्यांमधील ८९ मतदारसंघांत मतदान झाले. यात महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या ८ मतदारसंघांचा समावेश होता. सायंकाळी ५ वाजेपर्यंत या मतदारसंघांत सरासरी ५३.७० टक्के मतदान झाले असून दिग्गजांसह २०४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात भवितव्य बंद झाले आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५ टक्के, बुलडाणा मतदारसंघात ५२.२४ टक्के मतदान झाले आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात ५४.०४ टक्के तर वर्धा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ५६.६६ टक्के मतदान झाले होते. अत्यंत चुरशीची निवडणूक होत असलेल्या अमरावतीत ५४.५० टक्के मतदान झाले होते. अकोला लोकसभा मतदारसंघात ५२.४९ टक्के, हिंगोली मतदारसंघात ५२.०३ टक्के तर परभणी लोकसभा मतदारसंघात ६१ टक्के मतदान झाले.
नांदेड जिल्ह्यात तरुणाने
ईव्हीएम मशिन तोडली
नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ (ता. बिलोली) येथील एका मतदान केंद्रात एका तरुणाने कु-हाडीच्या तुंब्याने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेतले. भैय्यासाहेब येडके असे ईव्हीएम मशीन फोडलेल्या आरोपीचे नाव आहे. येडके हा सुशिक्षित तरुण असून तो बेरोजगार आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याचा त्याच्या मनात राग होता. याच रागातून त्याने ईव्हीएम मशीन फोडल्याची चर्चा गावात सुरू आहे. मतदान सुरू असताना शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली. ईव्हीएम फुटला असला तरी आतमधील डाटावर कोणताही परिणाम झाला नाही. या ठिकाणी मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली दरम्यान येथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR