30.7 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रराजू शेट्टी यांनी पाठिंबा न घेतल्यास उमेदवार देणार

राजू शेट्टी यांनी पाठिंबा न घेतल्यास उमेदवार देणार

कोल्हापूर : एकीकडे माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू असताना, ही चर्चा फिसकटल्याचे दिसत आहे. कारण महाविकास आघाडी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसे सूतोवाच केले आहेत. राजू शेट्टी यांनी पाठिंबा घेतला नाही तर आम्हाला उमेदवार द्यावा लागेल, असे जयंत पाटील म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते.

सांगलीत शिवसेनेने उमेदवार घोषित केला आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उतरवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र त्याला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. सांगलीची जागा काँग्रेसची असल्याची भावना वेळोवेळी काँग्रेस नेत्यांनी बोलून दाखवली आहे. मात्र यात आणखी काही मार्ग निघतो का याचे प्रयत्न सुरू आहेत, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, जयंत पाटील आणि मविआच्या भूमिकेनंतर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. राजू शेट्टी यांची ‘एकला चलो रे’ चीच भूमिका असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर पुन्हा कुणाशी बोलणं झालं नाही. जर भाजपचा पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीने उमेदवार उभा करू नये. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मी उभा राहणारच, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकरांचा निर्णय दोन दिवसांत
तिकडे वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोलणे सुरू आहेत, दोन दिवसांत अपेक्षित निर्णय होईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला. तर माढ्याची जागा महादेव जानकरांना देण्याचे ठरले होते, मात्र ते महायुतीसोबत गेले, तिथे दुसरा उमेदवार शोधावा लागेल, असेही जयंत पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR