30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीय विशेषव्हॉईस क्लोनिंगचे आव्हान

व्हॉईस क्लोनिंगचे आव्हान

माहिती-तंत्रज्ञानाचे विश्व बहरत आहे तसतसे सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत चालले आहे. सायबरविश्वातील गुन्हेगार याच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नव्या आविष्कारांचा आधार घेत गुन्हे करत आहेत. सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटिलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाने सोयीसुविधांत वाढ झालेली असताना दुसरीकडे याच्या मदतीने होणारे व्हॉईस क्लोनिंग ही नवीन समस्या म्हणून समोर येत आहे. ‘एआय’पासून तयार होणारे व्हॉईस क्लोनिंग हे ‘डीपफेक’ सारखे नवे प्रकार समोर आणत आहे. अशा स्कॅमरकडून अगदी आईवडिलांच्या आवाजाची नक्कल करून पैशांची मागणी करत गंडा घातल्याचे प्रकार समोर आले आहेत. नेमका काय आहे हा प्रकार?

रतासह संपूर्ण जगात सायबर गुन्हेगार त्याचा वापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करत आहेत. एआयच्या मदतीने ओळखीच्या लोकांच्या आवाजाची नक्कल करत दिशाभूल केली जात आहे. त्याला एआय ‘व्हॉईस क्लोनिंग’ असे म्हटले जाते. या क्षेत्रात प्रचंड प्रगती होत असल्याने गुन्हे देखील वाढले आहेत. सायबर गुन्हेगारासाठी नवीन शस्त्र म्हणून समोर आले आहे. या माध्यमातून कोणालाही सहजपणे टार्गेट करत फसवणूक करता येते. सायबर गुन्हा करणारे फसवणुकीसाठी क्लोन केलेल्या आवाजाचा वापर करतात. उदा बँक, कंपनी यासारख्या विश्वसनीय संस्थांचे प्रतिनिधी एवढेच नाही तर पीडितांचे मित्र किंवा नातेवाईकांचा आवाज वापरत व्यक्तिगत माहिती किंवा पैसे चोरण्यासाठी कॉल केला जातो किंवा ध्वनी मेल संदेश पाठवला जातो. जेणेकरून लोकांच्या भावनांशी खेळत कारस्थान तडीस नेले जाते. अशा स्थितीत ही समस्या खूपच गंभीर रूप धारण करत आहे. ‘मॅकअ‍ॅफी’च्या अहवालानुसार, ६९ टक्के भारतीय नागरिक हे मानवी आवाज आणि एआयनिर्मित आवाज यांच्यातील फरक ओळखण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यामुळेच व्हॉईस क्लोनिंगचे गांंभीर्य वाढत चालले आहे. त्याचवेळी ‘द आर्टिफिशियल इम्पोस्टर’च्या अहवालानुसार ४७ टक्के भारतीयांना त्याचा फटका बसला आहे किंवा व्हॉईस क्लोनिंगला बळी पडलेल्या लोकांना ते ओळखत आहेत.

जागतिक पातळीवर अशा रीतीने फसलेल्या लोकांची संख्या २५ टक्के आहे. याशिवाय ‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार २०२२ मध्ये ६५,८९३ सायबर गुन्हे नोंदले गेले. त्याचवेळी २०२१ मध्ये ५२,९७४ प्रकरणे नोंदली गेली आहेत. यात सर्वाधिक सुमारे ६५ टक्के प्रकरणे फसवणुकीची आहेत. विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच ठग देखील स्मार्ट असतात. फसवण्याची पारंपरिक पद्धत सोडून ते ऑनलाईनवर सहजपणे फसवणूक करत आहेत. व्हॉईस क्लोनिंगमुळे फसवणूक होण्याची शक्यता सर्वाधिक राहते.कारण या तंत्रापासून बहुसंख्य मंडळी अनभिज्ञ असतात. व्हॉईस क्लोनिंग हे एआय तंत्रज्ञान असून ते हॅकरला कोणाचाही आवाज रेकॉर्ड करून त्या आवाजाला ‘एआय’ टूलने विकसित करून त्याला नवे रूप देण्याची सुविधा प्रदान करतो. सध्या व्हॉईस क्लोनिंगसाठी असंख्य पेड आणि मोफत टूल्स आहेत किंवा सॉफ्टवेअर आहेत. त्याचा सहजपणे वापर करत व्हॉईस क्लोनिंग करता येते. एकदा आपण व्हॉईस रेकॉर्डिंगचा पुरेसा डेटा एकत्र गोळा करतो त्यावेळी व्हॉईस क्लोनिंग अ‍ॅप या डेटाचे संपादन करण्यास सुरुवात करते. डेटाला वेगवेगळ्या ध्वनी लहरींत विभागले जाते.

या आधारावर एआय त्याचे आकलन करत आवाज क्लोनिंग करण्याच्या प्रक्रियेला प्रतिसाद देते. एआय पुन्हा या ध्वनी लहरींना संबंधित स्वर, भाषेत छोट्या छोट्या भागात विभागते. अशावेळी व्हॉईस क्लोनिंगचा धोका हा केवळ व्यक्तिगत किंवा आर्थिक जोखमीपर्यंतच मर्यादित राहत नाही. या तंत्रज्ञानाच्या वाढत्या दुरुपयोगामुळे बरेच नुकसान होऊ शकते. एआय तज्ज्ञांच्या मते, बनावट ऑडिओ किंवा व्हीडीओमुळे चुकीची माहिती पसरली जाऊ शकते. एकप्रकारे जगातील अनेक देशांत अशांतता निर्माण होऊ शकते. परिणामी लोकशाही मार्गाने पार पाडल्या जाणा-या निवडणुकांना फटका बसू शकतो. कारण निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या भाषणाचा वापर करत व्हॉईस क्लोनिंगची समस्या ही उग्र रूप धारण करू शकते. सायबर गुन्हेगार हे विविध स्रोतांतून आवाजाचे नमुने एकत्र करू शकतात. जसे सोशल मीडियावरील व्हीडीओ, सार्वजनिक भाषण एवढेच नाही तर इंटरसेप्ट केलेले कॉल या आधारे आवाजाचे नमुने एकत्र केले जाऊ शकतात. तूर्त आज एआयच्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या दुरुपयोगामुळे व्हॉईस क्लोनिंगचे आव्हान मोडून काढण्याची गरज आहे.

तज्ज्ञांनी व्हॉईस क्लोनिंगचा आवाज ओळखण्यासाठी काही उपाय सुचविले आहेत. एखाद्याशी बोलताना आपल्याला समोरून अनेक प्रकारचे आवाज ऐकू येत असतील तर वेळीच सावध राहा. कारण एखाद्या गर्दीच्या ठिकाणी असलेल्या खोलीत आवाज क्लोन केलेला असू शकतो. अर्थात तंत्रज्ञानाच्या विकासाने असे संकेत ओळखणे कठीण आहे. परंतु अशा तंत्राबाबत सजग राहणे काळाची गरज आहे. तसेच तातडीने पैसे मागितले जात असतील तर सावध व्हा आणि समोरील व्यक्तीला असे प्रश्न विचारा की तो गोंधळात पडावा. त्याचबरोबर डिजिटल फुटप्रिंटबाबतही सजग राहण्याची गरज आहे. शिवाय ऑनलाईन अपलोड करण्यात येणा-या कागदपत्रांबाबतही काळजी घेतली पाहिजे. अनोळखी कॉलपासून सावध राहा आणि प्रामुख्याने अनोळखी नंबर किंवा तातडीची मदत हवी असल्याचा दावा करणा-या कॉलपासून सावध राहा. आपली सजगता ही फसवणुकीपासून आपला बचाव करू शकते.

– महेश कोळी, संगणक अभियंता

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR