34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयशंका-कुशंकांना विराम!

शंका-कुशंकांना विराम!

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी वेग पकडत असताना व सत्ताधारी भाजपने आक्रमक प्रचार व विरोधकांच्या आघाडीला सुरुंग लावण्याचे दुहेरी तंत्र अवलंबिलेले असताना इंडिया आघाडीकडून त्यास जेवढे सडेतोड उत्तर मिळायला हवे होते तेवढे ते मिळताना दिसत नव्हते. त्यामुळे साहजिकच विरोधी पक्षांमध्ये चलबिचल व अस्वस्थता जाणवत होती. त्यातूनच इंडिया आघाडीच्या ऐक्यावर व भवितव्यावरही शंका-कुशंका व्यक्त होत होत्या. अर्थात सत्ताधा-यांचाही हाच संभ्रम तयार करण्याचा अजेंडा असल्याने या शंका-कुशंकांना जास्तीत जास्त खतपाणी घालण्याचे प्रयत्न सत्ताधा-यांकडून व त्यांच्या समर्थकांकडून होत होते. मात्र, काँग्रेसने वेळीच या परिस्थितीचे आकलन करून सत्वर हालचाली केल्या आणि उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी व केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीसोबत जागावाटपाला अंतिम रूप दिल्याने सत्ताधारी भाजपच्या प्रपोगंड्यास सडेतोड उत्तर तर मिळालेच आहे पण इंडिया आघाडीबाबतच्या शंका-कुशंकांना विरामही मिळाला आहे.

जागावाटपात सपाचे अखिलेश यादव व ‘आप’चे केजरीवाल या दोघांनीही सुरुवातीपासून काहीशी आक्रमक व हटवादी भूमिका घेतली होती. मात्र, भाजपचा पाडाव करायचा तर विरोधकांचे ऐक्य गरजेचे असल्याचे सूत्र पक्के ध्यानात ठेवून काँग्रेसने जागावाटपात मन मोठे करून धस सोसण्याचा निर्णय पक्का केल्याने अखेर हे जागावाटप तडीला गेले आहे. केंद्रातील सत्तास्थापनेची चावी असणा-या उत्तर प्रदेशात सपाबरोबर जागावाटप निश्चित झाल्याने काँग्रेसने लोकसभा रणधुमाळीच्या पहिल्या टप्प्यात आघाडी घेतली आहे. त्यामुळे विरोधकांचे ऐक्य मोडित निघावे यासाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्या भाजपची झोप नक्कीच उडाली असणार! उत्तर प्रदेशात जागावाटपात काँग्रेसने १७ जागा लढवण्यावर तडजोड केली आहे. उर्वरित ६३ जागा सपा लढवणार आहे. आघाडी फिसकटल्याचे चित्र निर्माण झालेले असताना प्रियंका गांधी यांनी अखिलेश यादव यांना केलेल्या एका फोनने उत्तर प्रदेशातील चित्र पुरते बदलून गेले.

अखिलेश यादव रविवारी राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेतही सहभागी झाल्याने उत्तर प्रदेशातील मतदारांमध्ये इंडिया आघाडीच्या ऐक्याबाबत अत्यंत सकारात्मक संदेश गेला आहे. उत्तर प्रदेशसारख्या सर्वांत जास्त जागा असणा-या राज्यातील जागावाटपात काँग्रेसने आघाडी घेतल्याने त्याचा फायदा इतर राज्यांमधील जागावाटप वेगाने मार्गी लावण्यात काँग्रेसला होणार आहे. ही बाब काँगे्रस व इंडिया आघाडीचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. सपाच्या पाठोपाठ काँगे्रसने ‘आप’सोबतही राजधानी दिल्ली, गुजरात, गोवा, हरियाणा व चंदिगडमधील जागावाटपाला अंतिम रूप दिले आहे. शिवाय पंजाबमध्ये काँग्रेस व ‘आप’ स्वतंत्र लढणार असले तरी या लढती मैत्रीपूर्ण असतील असे दोन्ही पक्षांनी जाहीर केले आहे. यामुळे ‘अबकी बार चारसौ पार’च्या घोषणा देणा-या सत्ताधारी एनडीए आघाडीच्या तंबूत चिंतेचे वातावरण पसरले असणार! भाजपने अद्याप आपल्या कुठल्याच मित्रपक्षासोबत जागावाटप निश्चित केलेले नाही. आम्ही देऊ तेवढ्याच जागा मुकाट्याने घ्या, असाच भाजप श्रेष्ठींचा पवित्रा होता व या अतिआत्मविश्वासामागे इंडिया आघाडीतील विरोधकांच्या ऐक्यावर लावले जात असलेले प्रश्नचिन्ह हे प्रमुख कारण होते.

काँग्रेसने सपा व ‘आप’ यांच्यासोबत जागावाटप निश्चित करून आता भाजपच्या या अतिआत्मविश्वासालाच जोरदार हादरा दिला आहे. विरोधकांच्या ऐक्यासाठी काँग्रेसने मन मोठे केल्याने आता सत्ताधारी एनडीएत भाजपने असेच मन मोठे करून मित्रपक्षांना सन्मानजनक जागा द्याव्या ही अपेक्षा नक्कीच वाढू शकते व भाजप नेतृत्वाला त्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. तसेही जरी भाजप स्वबळावर ३७० व एनडीएच्या ४०० पार जागांच्या वल्गना करीत असला तरी सध्या प्रत्यक्षातील जमिनी स्थिती पाहता या वल्गना प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता कुठूनही जुळत नाही. भाजपची सर्वांत जास्त भिस्त ज्या राज्यांवर आहे त्या उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार व महाराष्ट्र या राज्यांमध्ये काँग्रेसने झळ सोसून विरोधी आघाडीचे ऐक्य अबाधित ठेवण्याचा स्पष्ट निर्धार केला आहे. उत्तर प्रदेशात व गुजरातमध्ये जागावाटप निश्चित झाले आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. बिहारमध्ये लालू यादव काँग्रेससोबतच्या आघाडीसाठी सुरुवातीपासूनच अनुकूल आहेत. आता नितीश कुमारांनी टोपी फिरवल्यावर तर लालू भाजप व नितीश यांच्या विरोधात आणखी आक्रमक झाले आहेत. भाजप व नितीश यांना धडा शिकवायचाच हाच लालूंचा निर्धार असल्याने बिहारमध्ये काँग्रेस व राजद यांच्यात जागावाटपात फारशी खळखळ होण्याची शक्यता नाहीच.

ज्या तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या ६३ जागा आहेत त्या आंध्र प्रदेश, तेलंगणा व ओडिशा राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्षांनी दोन्ही आघाड्यांपासून अंतर राखत तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारलेली आहे. भाजप आंध्र प्रदेशात तेलगू देसमशी आघाडी करण्याच्या प्रयत्नात असला तरी ही आघाडी भाजपचे स्वबळ वाढविण्याची शक्यता नाही कारण इथे भाजपचा फारसा प्रभाव निर्माण झालेला नाहीच. त्यामुळे लढत तेलगू देसम व जगमोहन रेड्डी यांच्यातच होणार हे स्पष्ट आहे. तेलंगणात काँग्रेस व बीआरएस यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे. इथेही भाजपला फारसे स्थान नाहीच. ओडिशात बिजू जनता दल व भाजपमध्ये प्रमुख लढत होऊ शकते. मात्र, येथे बिजू जनता दल भाजपपेक्षा खूप प्रभावी आहे. दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू राज्यांमध्ये भाजपने कुणाशीही आघाडी केली तरी भाजपला स्वबळ वाढविता येणे शक्य नाही. अशा स्थितीत भाजपला आपली घोषणा वास्तवात उतरवायची तर प. बंगाल व ईशान्येकडील राज्यात अक्षरश: एकतर्फी विजय मिळवण्याचा चमत्कार घडवावा लागेल.

या तुलनेत आज काँग्रेस कमजोर भासत असली तरी संपूर्ण देशात पक्ष म्हणून काँग्रेसचे अस्तित्व व प्रभाव आहे. शिवाय पक्षाचे संघटनही आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांसोबतची आघाडी काँग्रेसला फायदा देणारी व भाजपला तोटा पोहोचवणारी ठरणार आहे. काँगे्रस नेतृत्वाने हे ओळखून भाजपला रोखण्याचा निर्धार पूर्णत्वास नेण्यासाठी जागावाटपात मन मोठे करण्याचा जो निर्णय घेतलाय तो अतिशय योग्य व काँग्रेसच्या हिताचाच ठरणार आहे. काँग्रेस व विरोधकांच्या आघाडीने भाजपला २५० जागांच्या आसपास रोखले तर निवडणूक निकालानंतर तीन राज्यांतील तटस्थ पक्ष इंडिया आघाडीच्या सरकार स्थापनेला बळ देऊ शकतात. हे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी सध्या थोडीफार धस सहन करण्याचा मोठेपणा दाखविणे फायद्याचेच कारण त्यातून मित्रपक्षांचा काँग्रेसवरचा विश्वास दृढ होणार आहे, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR