नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या सामन्याच्या अंतिम टप्प्यात सहकारी खेळाडू ट्रिस्टन स्टब्सला हातमोजे बदलण्याची संधी नाकारण्यात आल्यानंतर, दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज नितीश राणाची थेट सामन्यातील अधिका-यांशीच जोरदार बाचाबाची झाली. या कृतीबद्दल राणावर आता दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे; आयपीएलगव्हर्निंग कॉन्सिलने त्याच्या सामन्याच्या मानधनातून २५ टक्के रक्कम कापून घेतली आहे, तसेच त्याला एक ‘डिमेरिट पॉईंट’ देखील देण्यात आला आहे.
दिल्लीच्या डावातील १९ व्या षटकात दिल्लीचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्स याने खेळ सुरू असताना ग्लोव्हज बदलण्याची मागणी केली होती. मात्र, खेळाचा वेग कायम राखण्याच्या नियमाचा हवाला देत चौथ्या पंचांनी ही मागणी फेटाळून लावली. यावेळी डगआऊटमध्ये बसलेला नितीश राणा पंचांच्या या निर्णयावर प्रचंड संतापलेला दिसला. त्याने सीमारेषेवर जाऊन पंचांशी बराच वेळ आक्रमकपणे हुज्जत घातली. त्या वेळी ‘बेंच’वर बसलेला राणा या निर्णयामुळे स्पष्टपणे संतापलेला दिसत होता. त्याने सीमारेषेवर उपस्थित असलेल्या अधिका-याशी बराच वेळ आणि अत्यंत आक्रमकपणे बाचाबाची केली.
आयपीएलच्या अधिकृत निवेदनानुसार, राणाने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.३ चे उल्लंघन केल्याचे आढळून आले. हे कलम ‘सामन्यादरम्यान मोठ्याने अपशब्द किंवा असभ्य भाषा वापरण्याशी’ संबंधित आहे.
स्टब्सनेही दिली तीव्र प्रतिक्रिया
हातमोजे बदलण्याची विनंती फेटाळल्यानंतरच्या पुढच्याच चेंडूवर स्टब्स बाद झाला. दिल्लीच्या गोटात असलेल्या संतापाला खतपाणी मिळाले. खुद्द स्टब्सनेही पॅव्हेलियनमध्ये परतताना आपली हेल्मेट आणि बॅट रागाने भिरकावून दिली.
राणाने केली चूक मान्य
अशा प्रकरणांमध्ये, ‘सामनाधिका-याचा’ निर्णय अंतिम आणि सर्वांवर बंधनकारक असतो. नितीश राणाने आपली चूक मान्य केली आहे. तसेच सामनाधिका-याने सुनावलेली शिक्षा मान्य केली. आचारसंहितेच्या ‘स्तर १’च्या उल्लंघनाबाबत, सामनाधिका-याचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो, असे लीगने आपल्या अधिकृत प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट केले आहे.

