36.2 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडा१३ वर्षांपूर्वी भारताने याच दिवशी जिंकला होता एकदिवसीय विश्वचषक

१३ वर्षांपूर्वी भारताने याच दिवशी जिंकला होता एकदिवसीय विश्वचषक

विजयाचा क्षण आठवून खेळाडूने दिल्या प्रतिक्रिया

नवी दिल्ली : २०११ मध्ये याच दिवशी भारताने श्रीलंकेला हरवून एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळून १३ वर्षे झाली आहेत. माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, बीसीसीआयचे सचिव जय शहा, विश्वचषकाचा नायक युवराज सिंग आणि सुरेश रैना यांनी त्या क्षणाची आठवण काढून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारताचा हा विजय खूप महत्त्वाचा होता कारण भारत मागील २८ वर्षांपासून विश्वचषकाची प्रतीक्षेत होता.

२०११ च्या विजयाची आठवण करून देत, भारताला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या सचिनने इन्स्टाग्रामवर लिहिले की, माझ्या बालपणीचे स्वप्न १३ वर्षांपूर्वी साकार झाले. त्यासाठी भारतीय संघाला पाठिंबा दिलेल्या करोडो लोकांचा मी सदैव ऋणी राहीन असे सचिनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सचिनचा हा सहावा विश्वचषक होता. तर २०११ च्या विश्वचषकात प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरलेले युवराज सिंग आणि सुरेश रैना यांनीही या विश्वचषकाच्या विजयी क्षणाची आठवण काढली.

युवराजने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये वर्ल्ड कपच्या आठवणींचा व्हीडीओ पोस्ट केला आणि लिहिले, ते क्षण अनुभवत आहे. या विजयाची आठवण करून देताना रैनाने लिहिले की, तो ऐतिहासिक विजय आठवून आजही हसू येते. विशेष म्हणजे अंतिम सामन्यात भारताचा स्टार फलंदाज गौतम गंभीरने ९७ धावा काढून भारताला विजय मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी केली होती.

धोनीने विजयी षटकार ठोकला
२०११ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता. श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि महेला जयवर्धनेच्या ११३ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर ५० षटकांत सहा गडी गमावून २७४ धावा केल्या. तर २७४ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सेहवाग आणि सचिन लवकरच बाद झाले. मात्र, गौतम गंभीर (९७), विराट कोहली (३५), महेंद्रसिंग धोनी नाबाद ९१ आणि युवराज सिंग नाबाद २१ धावांनी भारताला विजय मिळवून दिला. कर्णधार धोनीने भारतासाठी विजयी षटकार ठोकला, ज्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR