34.1 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडाचेन्नईकडून मुंबईला २०७ धावांचे आव्हान

चेन्नईकडून मुंबईला २०७ धावांचे आव्हान

मुंबई : मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे यजमान मुंबई इंडियन्सचे कमी, तर चेन्नई सुपर किंग्सचे घरचे मैदान वाटत होते. धोनीचा शेवटचा आयपीएल असा अंदाज बांधून त्याचे चाहते वानखेडेवर उपस्थित होते. पण, ऋतुराज गायकवाड आणि लोकल बॉय शिवम दुबे यांनी केलेल्या फटकेबाजीने मैदान गाजवले. एमआयच्या गोलंदाजीतील कमकुवतपणा आजही स्पष्ट दिसला. धोनीने २० व्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सलग ३ षटकार खेचले.

अजिंक्य रहाणेला (८) सलामीला पाठवण्याची चेन्नईची रणनीती फेल गेली. पण, कर्णधार ऋतुराज गायकवाड व रचीन रवींद्र (२१) यांनी दुस-या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी करून डाव सावरला. लोकल बॉय शिवम दुबेने आज मुंबई इंडियन्सच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. ऋतुराजने ३३ चेडूंत अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ दुबेनेही २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी चौकार-षटकारांचा सपाटा लावला होता आणि हार्दिक पांड्याने ही जोडी तोडली. उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज ६९ ( ४० चेंडूं, ५ चौकार व ५ षटकार) धावांवर झेलबाद झाला. त्याने तिस-या विकेटसाठी दुबेसह ४५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली.

आयपीएलमध्ये सर्वात कमी इनिंग्जमध्ये २००० धावा पूर्ण करणा-या भारतीय फलंदाजाचा विक्रम ऋतुराजने नावावर केला. त्याने ५७ इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडून लोकेश राहुल (६०), सचिन तेंडुलकर( ६३), रिषभ पंत ( ६४) व गौतम गंभीर ( ६८) यांना मागे टाकले. पण, दुबे ऐकणारा नव्हता आणि त्याने रोमारियो शेफर्डच्या चौकार-षटकारांची आतषबाजी केली. धोनीच्या आधी डॅरिल मिचेलला पाठवण्याचा निर्णय चाहत्यांना फार आवडला नाही. मिचेल १४ चेंडूंत १७ धावांवर झेलबाद झाला आणि शेवटच्या ४ चेंडूंसाठी धोनी मैदानावर येताच स्टेडियम दणाणून गेले. धोनीने पहिलाच चेंडू मिड ऑनच्या दिशेने सीमापार पाठवला आणि नेहा धुपिया चकित झाली. त्यानंतर पुढील दोन चेंडू षटकार खेचले व शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेऊन धोनीने ४ चेंडूंत २० धावा चोपल्या व चेन्नईला ४ बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवले. दुबे ३८ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR