39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडस्वारातीमच्या कुलगुरुपदी डॉ मनोहर चासकर यांची नियुक्ती

स्वारातीमच्या कुलगुरुपदी डॉ मनोहर चासकर यांची नियुक्ती

नांदेड : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अधिष्ठाता व पुणे येथील प्रो. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोहर गणपत चासकर यांची नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ मनोहर चासकर यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. डॉ मनोहर चासकर यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील, यापैकी जे अगोदर असेल तोपर्यंत, करण्यात आली आहे. डॉ मनोहर चासकर (जन्म ३० ऑक्टोबर १९६६) यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात एम. एस्सी. तसेच पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. स्वारातीमचे कुलगुरु डॉ उध्दव भोसले यांचा कार्यकाळ दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सपंल्याने विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रकाश महानवर यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कुलगुरु नियुक्तीसाठी राज्यपालांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ एस. एस. मंथा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. आयआयटी पाटनाचे संचालक प्रो. टी. एन. सिंह व उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी तसेच तसेच कर्नाटक येथील महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मीना आर चंदावरकर (युजीसी प्रतिनिधी) हे ‘स्वारातीम’कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ मनोहर गणपत चासकर यांची निवड जाहीर केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR