38.9 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरआबा कांबळे खून प्रकरणात कॉल डिटेल्सवर युक्तिवाद

आबा कांबळे खून प्रकरणात कॉल डिटेल्सवर युक्तिवाद

सोलापूर : शहरामध्ये सनसनाटी ठरलेल्या आबा कांबळे खून खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू आहे. सरकार पक्षाच्या अंतिम युक्तिवादाला शनिवारी विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांच्यासमोर सुरुवात झाली. ७ जुलै २०१८ रोजी सत्यवान ऊर्फ आबा विष्णू कांबळे याचा नवी पेठेतील मोबाइल गल्ली येथे तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला करून खून करण्यात आला होता.

याबाबत सुरेश ऊर्फ गामा अभिमन्यू शिंदे, रविराज दत्तात्रय शिंदे, अभिजीत ऊर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे, प्रशांत ऊर्फ आप्पा पांडुरंग शिंदे, निलेश प्रकाश महामुनी, तौसिफ गुरुलाल विजापुरे व विनीत ऊर्फ ईश्वर भालचंद्र खाणोरे या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गामा पैलवान यांचा मुलगा ऋतुराज शिंदे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सर्व आरोपींनी संगनमत करून, कट रचून आबा कांबळे हा मोबाइल गल्लीत मित्रांसोबत बोलत असताना कोयत्याने हल्ला करून त्याचा खून केला होता. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल झाला होता.खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

सरकार पक्षाने आपल्या अंतिम युक्तिवादाला सुरुवात केली आहे. यात सरकारी वकिलांनी या खटल्यात इलेक्ट्रॉनिक पुरावा, सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा, आरोपी साक्षीदार यांच्यातील फोन कॉल डिटेल्स, आरोपींचे घटनेच्या वेळचे लोकेशन, नेत्रसाक्षीदारांचा पुरावा, न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळेचा पुरावा, परिस्थितीजन्य पुरावा हे सरकार पक्षाच्या बाजूने असल्याचा युक्तिवाद केला. सरकार पक्षाचा उर्वरित युक्तिवाद येत्या सोमवारी होणार आहे. त्यानंतर बचाव पक्षाचा युक्तिवाद होऊन खटल्याचा निकाल लागणार आहे. या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, आरोपींतर्फे अ‍ॅड. श्रीकांत जाधव, अ‍ॅड. शशी कुलकर्णी, अ‍ॅड. प्रशांत नवगिरे, अ‍ॅड. आकाश देठे, अ‍ॅड. शिव झुरळे हे काम पाहत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR