29.3 C
Latur
Tuesday, May 7, 2024
Homeसोलापूरसातपुते यांच्या व्हिडिओबाबत चौकशी,जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची पत्रकार परिषदेत माहिती

सातपुते यांच्या व्हिडिओबाबत चौकशी,जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची पत्रकार परिषदेत माहिती

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी दीपक ऊर्फ व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण, त्यापूर्वी त्यांनी अमरावती, नागपूर व विजयपूर येथे देखील अर्ज दाखल केले होते. निवडणूक आयोगाच्या संहितेनुसार एका उमेदवाराला केवळ दोन मतदारसंघातूनच निवडणूक लढविता येत असतानाही त्यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. दुसरीकडे आमदार राम सातपुतेंच्या आक्षेपार्ह व्हिडिओसंदर्भात दोन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याचीही चौकशी होऊन अहवाल निवडणूक आयोगाला पाठविला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या तयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, आमदार राम शिंदे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यासंदर्भात आमच्याकडे दोन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याअनुषंगाने तो व्हिडिओ पाहिला जाईल. त्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविला जाईल, दुसरीकडे लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी प्रतिज्ञापत्रात स्वयंघोषणापत्र देताना त्यात दोनपेक्षा अधिक मतदारसंघात उमेदवारी अर्ज न भरल्याची माहिती खोटी दिली तथा लपविल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला, पण त्यांनी खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांच्यावर एफआयआर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच माढा लोकसभा मतदारसंघात नोटासह ३३ उमेदवार असल्याने त्याठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावर तीन बॅलेट मशिन लागतील तर सोलापूर मतदारसंघातून नोटासह २२ उमेदवार असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट मशिन लागतील, असेही त्यांनी सांगितले. मशिनवर संबंधित उमेदवारांची नावे अंतिम करण्याचे काम १ मेपूर्वी पूर्ण होईल,असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सी-विजील या अ‍ॅपवर १५२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ६६ तक्रारीत काही प्रमाणात तथ्य आढळले आहे. त्या तक्रारींचा निपटारा त्या त्यावेळी केला आहे. तर १४ ऑफलाइन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. आचारसंहिता भंगाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ३० ते ४० मिनिटात त्यावर अ‍ॅक्शन घेतली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नमुन्यात उमेदवारांनी निवडणुकीचा दररोजचा विविध खर्च सादर करणे व अचूक ठेवणे बंधनकारक आहे. खर्च विहित नमुन्यात न ठेवला किंवा तो अपूर्ण आढळल्यास त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविला जाईल. त्यात गंभीर त्रुटी असतील तर संबंधित उमेदवारावर सहा वर्षे निवडणूक न लढविण्याची बंदी देखील येवू शकते, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहाळी, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उपस्थित होते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR