31.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeसोलापूरबदलत्या समीकरणांमुळे करमाळ्यात चुरस वाढली

बदलत्या समीकरणांमुळे करमाळ्यात चुरस वाढली

करमाळा : माढा लोकसभा मतदारसंघात करमाळ्याचे राजकारण हे सातत्याने बदलते राहिले असून या बदलाचे प्रतिबिंब लोकसभेच्या राजकारणातही उमटताना दिसते आहे. करमाळ्याच्या राजकीय पटावरील राजे, वजीर आणि बादशहा सारखी आपली चाल बदलत ठेवत असल्याने करमाळ्यातील राजकीय पट सातत्याने बदलत आहे.

माढा लोकसभेच्या निवडणुकीत धैर्यशील मोहिते-पाटलांच्या उमेदवारीने भलतीच चुरस निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून सक्रिय झालेल्या आ. संजयमामांच्या प्रतिष्ठेची, तर नारायणआबाच्या वर्चस्वाची लढाई आहे. नेत्यांच्या सततच्या पक्षबदलामुळे मतदारही बुचकळ्यात पडले आहेत. कोणता नेता कुठे आहे हेच जनतेला कळेनासे झाले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशील मोहिते-पाटील व रमेश बारसकर यांचे अर्ज दाखल झाले आहेत. सर्वांकडूनच आता प्रचार सुरू झाला आहे. खरी लढत मोहिते पाटील व निंबाळकर यांच्यातच असल्याचे चित्र आहे. आ. संजयमामांनी महायुतीच्या घटक पक्षांना बरोबर घेऊन प्रचार सुरू केला आहे. नारायण आबा शिंदे सेना सोडून शरद पवारांकडे जात आहेत. २६ एप्रिलला करमाळ्यात शरद पवारांची सभा होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक एकतर्फी आहे, असे सध्या कोणालाही वाटत नाही. अत्यंत अटीतटीचा सामना होण्याची चिन्हे आहेत.

आमदार संजयमामा शिंदे हे निंबाळकर यांना मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर त्यांचे विरोधक माजी आमदार पाटील हे मोहिते-पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बागल गटाचे समर्थक बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांचे बंधू काँग्रेस (आय) चे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप युतीचा धर्म पाळत मोहिते-पाटलांबरोबर सक्रिय झाले आहेत. शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे सक्रिय झाले आहेत.

गेल्या निवडणुकीत बागल गट संजयमामांबरोबर होता. त्यानंतर रश्मी बागल विधानसभा निवडणुकीत संजयमामांच्या विरोधात उतरल्या व त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. आता त्या भाजपवासी झाल्या आहेत. रश्मी बागल प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप भाजपमध्ये आहेत पण मोहिते पाटलांबरोबर त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत. सध्या तरी ते शांत आहेत.

त्यांचे चिरंजीव भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष शंभुराजे जगताप निंबाळकरांबरोबर फिरत आहेत तर दुसरे चिरंजीव माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप मोहितेंच्या गोटात सक्रिय झाले आहेत.करमाळा तालुक्याच्या राजकारणात मोहिते पाटील विरुध्द संजय शिंदे हाच खरा सामना असून माढा लोकसभेतही खरी टक्कर या दोन गटांतच होत आहे. जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा मोहिते पाटलांचे प्राबल्य वाढू नये म्हणून शिंदे गट पूर्ण ताकदीने निंबाळकरांना साथ देत असून माढा लोकसभेच्या निकालाचे पडसाद करमाळा तालुक्यातील आगामी राजकारणात उमटताना दिसतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR