38.7 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeलातूरभाजपाची पराभूत मानसिकता तर महाविकास आघाडीची विजयी घोडदौड 

भाजपाची पराभूत मानसिकता तर महाविकास आघाडीची विजयी घोडदौड 

लातूर : एजाज शेख  
लातूर लोकसभा मतदारसंघातील २०१९ ची भारतीय जनता पार्टी आणि आताची म्हणजेच २०२४ ची भाजपा महायुती यात खूप मोठी तफावत आहे. पक्षांतर्गतच नव्हे तर महायुतीतील गटबाजी, नेत्यांमधील विसंवाद, एकमेकांकडे शंकायुक्त नजरेने पाहणे, हेवेदावे, मी बडा, तू बडाची ईर्षा यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती प्रारंभीपासूनच पराभूत मानसिकतेत दिसून येत आहे. विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी मिळणार नाही, असे दोन वर्षांपासून जाहीरपणे सांगितले जात होते.
परंतु, भाजपाने पहिल्याच यादीत सुधाकर शृंगारे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि येथेच त्याची फसगत झाली. नामनिर्देशनपत्र दाखल करेपर्यंत उमेदवार बदलण्याची चर्चा मतदारसंघात सर्वत्र सुरू होती. पक्षांतर्गत गटबाजीचा मोठा फटका भाजपा महायुतीला बसणार आहे. या उलट काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांची निवडणूक मतदारांनीच हाती घेतल्याचे चित्र दिसून येत असल्यामुळे काँग्रेस महाआघाडीची विजयी घोडदौड जोमाने सुरू आहे.
लातूर लोकसभा  मतदारसंघ २००९ पासून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या राखीव मतदारसंघात २००९ मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक झाली. त्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार जयंत आवळे यांनी भाजपाचे उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांचा पराभव करीत विजय मिळविला होता. याच मतदारसंघात २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे डॉ. सुनील गायकवाड यांनी काँग्रेसचे दत्तात्रय बनसोडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांचा पराभव केला होता. लोकसभेच्या गेल्या तीन निवडणुका पाहिल्या तर भाजपाने दरवेळी नवा चेहरा उतरविलेला आहे.
त्यामुळे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी मिळणार नाही, असे दोन वर्षांपासून जाहीरपणे भाजपाचे पदाधिकारी सांगत होते. त्यामुळे शृंगारे यांनी सर्वसामान्य मतदार तर सोडाच पण पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्याही भेटी घेतल्या नाहीत. असे असतानाही भाजपाच्या पहिल्या यादीत अचानक शृंगारे यांचे नाव जाहीर झाले तरी त्याचे स्वागत करण्याऐवजी उमेदवार बदलण्याचीच चर्चा सुरू होती. जिंकायचे असे तर उमेदवार बदला, ही मानसिकता भाजपा आणि सहयोगी पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची झाली आणि तीच मानसिकता कायम ठेवून शृंगारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. पराभूत मानसिकतेत असणारे भाजपा आणि सहयोगी पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आजही चाचपडतच आहेत.
लातूर लोकसभा मतदारसंघातून सुधाकर शृंगारे यांना निवडून आणण्याची सर्वस्वी जबाबदारी भाजपाने निलंग्यावर टाकल्याने औसा आणि एमआयटीने डोळे वटारले आहेत. भाजपामधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येच सुसंवाद नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच शृंगारे यांचे सारथ्य करणारे निलंगेकर यांनी एका बैठकीत ‘मागच्या दाराने कोणी गद्दारी करणार असाल तर याद राखा’, असा दम भरल्याने स्वत: भाजपा आणि भाजपाच्या सहयोगी पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमच्यावर संशय घेतला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तेव्हापासून तर भाजपा महायुतीमध्ये बेबनाव वाढतच गेला आहे. विशेष म्हणजे भाजपा सहयोगी पक्षांचे अस्तित्व लातूर लोकसभा मतदारसंघात एवढे भक्कम नाही. त्यामुळे भाजपा महायुती सध्या पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे.
काँग्रेस महाआघाडीतील सहयोगी पक्ष आघाडीचा धर्म प्रामाणिकपणे पाळत आहेत. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेस महाआघाडीची एकसंध मोट बांधली गेली आहे. अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे  उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, उद्धव ठाकरे सेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने प्रचारात आपापली भूमिका सक्षमपणे पार पाडत असल्यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेस महाआघाडी आपल्या ताब्यात घेणार हे निश्चित आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR