38.3 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeपरभणीशेतमाल तारण योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा

शेतमाल तारण योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा

जिंतूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतक-यांसाठी शेतमाल ठेवून कमी व्याजदरात तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी केले आहे.

बाजारपेठेत दर कमी असल्यास शेतकरी शेतमाल विकु शकत नाही. दुसरीकडे पैशाचे काम असल्यावर शेतक-यांना नाईलाजास्तव खाजगी सावकाराकडून अव्वाची सव्वा दराने कर्ज घेऊन आपली कामे करावी लागतात. त्यामुळे बळीराजाला आर्थिक फटका बसत असल्याने शेतक-यांच्या हितासाठी कृउबा सभापती बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून बाजार समितीच्या वतीने २०२३-२४ हंगामातील खरीप व रब्बीतील पिकांसाठी शेतमाल तारण योजना सुरू केलेली आहे. शेतक-यांनी तूर, सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा व हळद आदी वखार महामंडळात ठेवल्यास त्याच्या पावतीवर बाजार समितीकडून सध्याच्या दर किंवा हमीभावापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे होणा-या एकूण किंमतीवर ७५ टक्के रक्कम ६ टक्के व्याज दराने १८० दिवसांसाठी दिले जाते अशी माहिती सभापती बोर्डीकर यांनी दिली आहे.

शेतक-यांसाठी बाजार समितीने टीएमसी यार्डातील शेडमध्ये लिलावाद्वारे सध्या विक्री सुरू केलेली आहे. त्याठिकाणी बाजार समितीचे सचिव एस.बी. काळे व कर्मचा-यांच्या नियंत्रणात खरेदी- विक्री प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतक-यांच्या शेतमालास जास्तीत जास्त भाव मिळेल व मापात फसवणूक होणार नाही असेही कळविण्यात आलेले आहे. शेतमाल विक्री करावयाचा असेल त्यांनी तो येथे आणावा असे आवाहन सभापती बोर्डीकर यांनी केले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR