संयुक्त राष्ट्र : इस्राईल आणि हमास यांच्यातील युद्ध अधिक तीव्र झाले आहे. दरम्यान, इस्राईलच्या पॅलेस्टाईनमधील वसाहतींच्या विरोधात संयुक्त राष्ट्रात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी भारताने पॅलेस्टाईनचे समर्थन केले असून भारताने संयुक्त राष्ट्रात इस्राईलच्या विरोधात मतदान केले आहे. या प्रस्तावाला अमेरिका आणि कॅनडासह ७ देशांनी विरोध केला असला तरी ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. मतदानादरम्यान १८ देश गैरहजर राहिले. वृत्तानुसार, भारताने पूर्व जेरुसलेम आणि व्याप्त सीरियन गोलानसह ‘व्याप्त पॅलेस्टाईन प्रदेशात’ इस्राईलच्या वस्तींचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या ठरावाच्या बाजूने मतदान केले आहे.
अहवालानुसार, ९ नोव्हेंबरला त्याचा मसुदा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दोन दिवसांनी हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. ‘पूर्व जेरुसलेम आणि व्याप्त सीरियन गोलानसह व्याप्त पॅलेस्टिनी भूभागात इस्रायली वसाहती’ या शीर्षकाचा संयुक्त राष्ट्रसंघाचा मसुदा ठराव प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आला. अमेरिका आणि कॅनडासह केवळ सात देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. ठरावाच्या विरोधात मतदान करणाऱ्या देशात हंगेरी, इस्राईल, मार्शल बेटे, मायक्रोनेशिया आणि नाउरू यांचा समावेश आहे.
भारताने नेहमीच पॅलेस्टाईनचे सार्वभौम, स्वतंत्र आणि व्यवहार्य राज्य स्थापन करण्यासाठी इस्राईलशी थेट वाटाघाटी करण्याचे समर्थन केले आहे. इस्राईलमध्ये ऑक्टोबरमध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमासवर टीका केली असतानाच परराष्ट्र मंत्रालयाने भारत दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधात उभा असला तरी इस्राईल-पॅलेस्टाईनबाबत आपली भूमिका कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.