34.1 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडाकोलकाताची लखनौवर मात

कोलकाताची लखनौवर मात

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आज लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवला. पाच सामन्यांतील केकेआरचा चौथा विजय ठरला आणि ८ गुणांसह त्यांची दुस-या क्रमांकावरील पकड मजबूत झाली आहे. एलएसजीचा सहा सामन्यांतील तिसरा पराभव ठरला. मिचेल स्टार्कने आज ३ विकेट्स घेतल्या आणि काल मेंटॉर गौतम गंभीरने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.

केकेआरच्या गोलंदाजांनी चांगला मारा करून एलएसजीच्या धावांवर अंकुश ठेवला होता. मिचेल स्टार्कने २०व्या षटकात दोन विकेट्स घेऊन त्याच्या ४ षटकांत २८ धावांसह तीन विकेट्स पूर्ण केल्या. वैभव अरोरा, सुनील नरीन, वरुण चक्रवर्थी व आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेऊन एलएसजीला दडपणात राखले होते. पण, निकोलस पूरनने ते झुगारले आणि ३२ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावा केल्या. एलएसजीकडून कर्णधार लोकेश राहुल ( ३९) व आयुष बदोनी ( २९) यांनी त्यानंतर सर्वाधिक धावा केल्या. निकोलसच्या फटकेबाजीने लखनौला ७ बाद १६१ धावांचा सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला.

पदार्पणवीर शमार जोसेफच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यश ठाकूरने फिल सॉल्टचा झेल टाकला. पण, तो नो बॉलही होता. त्यानंतर जोसेफची लय बिघडली आणि तो एक चेंडू पूर्ण करण्यासाठी जोसेफने १३ धावा दिल्या. त्याच्या पहिल्या षटकात २२ धावा कुटल्या गेल्या. पण, मोहसिन खानने त्याच्या पहिल्या षटकात सुनील नरीनला ( ६) बाद करून केकेआरला पहिला झटका दिला. मोहसिनने त्याच्या दुस-या षटकात अंगक्रिश रघुवंशीला ( ७) सहज माघारी पाठवले. शमरने त्याच्या पुढील षटकात चांगले पुनरागमन केले आणि त्याच्या तिस-या षटकात फिल सॉल्टचा झेल एलएसजीच्या खेळाडूने टाकला.

शमारच्या तीन षटकांत ३ झेल सुटले आणि सॉल्टचे नशीब आज तगडे राहिले. सॉल्टने २६ चेंडूंत अर्धशतक झळकावताना केकेआरला ९.४ षटकांत शतकपार नेले. दिशाहीन गोलंदाजीचा फटका एलएसजीला बसला आणि सॉल्ट व श्रेयस अय्यर यांनी मॅच विनिंग भागीदारी केली. श्रेयसने नाबाद ३८ धावा केल्या आणि संघाला ८ विकेट्सने विजय मिळवून दिला. सॉल्ट ४७ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह ८९ धावांवर नाबाद राहिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR