38.3 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रहातकणंगल्यातून आमदार प्रकाश आवाडे यांची माघार

हातकणंगल्यातून आमदार प्रकाश आवाडे यांची माघार

सांगली : इंचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ताराराणी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेमुळे येथे शिवसेना, स्वाभीमानी, शिवसेना (ठाकरे गट), वंचित आणि आवाडे अशी पंचरंगी लढत होणार होती.

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आवाडे यांच्याशी चर्चा करुन निवडणुकीतून माघार घेण्यासाठी राजी केले. आता आवाडे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने येथील पंचरंगी लढत टळणार आहे.

दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरातील शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी आवाडे यांची भेट घेत त्यांना माघार घेण्याची विनंती केली होती. मात्र, या भेटीनंतरही आवाडे निवडणूक लढवण्यावर ठाम होते.

मात्र, आज हातकणंगलेतून धैर्यशील माने आणि कोल्हापूरातून संजय मंडलिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई, माजी मंत्री रामदास कदम या नेत्यांनी आवाडेंना पुन्हा विनंती केली असता, त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.

२०१९ पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या प्रकाश आवाडे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता. पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षाला पांिठबा देत, भाजपचे सहयोगी सदस्यपद स्वीकारले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी आवाडे यांना महायुतीच्या उमेदवाराचे काम करण्याची विनंती केली आहे. जर आवाडे यांनी निवडणुकीत खासदार माने यांचे काम केले तर त्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

अशी रंगणार हातकणंगलेची लढत
हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी खासदार राजू शेट्टी स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून लढत आहेत.

दरम्यान राजू शेट्टी यांनी महाविका आघाडी तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लढण्यास नकार दिल्याने. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर यांना संधी देण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीने डी.सी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हातकणंगलेमध्ये मोठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR