36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeराष्ट्रीयनरेंद्र मोदींना २८ पैशांचा पंतप्रधान म्हणायला हवे

नरेंद्र मोदींना २८ पैशांचा पंतप्रधान म्हणायला हवे

- उदयनिधी स्टॅलिन यांची टीका

नवी दिल्ली : तमिळनाडूचे मंत्री आणि द्रमुक (डीएमके)पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी भाजपाप्रणीत केंद्र सरकारवर टीका केली. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार असमान प्रमाणात निधीचे वाटप करत आहे. राज्यांकडून कराच्या स्वरूपात एक रुपयाचा महसूल केंद्राला जात असेल तर त्यातील फक्त २८ पैसे परत मिळतात, असा आरोप उदयनिधी स्टॅलिन यांनी केला.

तामिळनाडूमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी रामनाथपूरम आणि थेनी या दोन ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या असमान निधी वाटपावर कडाडून टीका केली. यापुढे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना २८ पैशांचा पंतप्रधान म्हणू, असेही ते म्हणाले. उदयनिधी हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांचे सुपुत्र आहेत. तसेच तमिळ सिनेसृष्टीत अभिनेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.

उदयनिधी स्टॅलिन हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भाजपा सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावरही टीका केली. हे धोरण तामिळनाडूमधील मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करेल, असे ते म्हणाले. केंद्राने तमिळनाडूचा निधी अडवला असून अनेक विकासाचे प्रकल्प रोखून धरले आहेत. तसेच तामिळनाडूमध्ये नीट परीक्षा बंद करू, असेही आवाहन उदयनिधी स्टॅलिन यांनी केले. यासाठी स्टॅलिन यांनी एम्स मदुराईचे उदाहरण दिले. भूमिपूजन केल्यानंतर या प्रकल्पाची एक वीटही रचली गेली नाही, असे ते म्हणाले.

तसेच जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हाच पंतप्रधानांचे पाय तामिळनाडूला लागतात. इतरवेळी ते तामिळनाडूकडे पाहतही नाहीत, अशीही टीका त्यांनी केली. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या ३९ जागा आहेत. १९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात या ३९ जागांसाठी मतदान पार पडेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR