30.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप-ठाकरे गटात फोटोवॉर

भाजप-ठाकरे गटात फोटोवॉर

आरोप-प्रत्यारोप, राऊतांचा बावनकुळेंवर आरोप, भाजपकडून आदित्य ठाकरे लक्ष्य

मुंबई : प्रतिनिधी
सत्ताधा-यांवर रोजच आरोपांच्या तोफा डागणा-या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा परदेशातील फोटो प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली. महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊ येथे कसिनोत जुगार खेळत आहेत, असा आरोप त्यांनी केला. एवढेच नव्हे, तर हा फोटो समाजमाध्यमांतून प्रसिद्ध करताना त्यांनी हा फोटो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला. यासोबतच आपल्याकडे असे आणखी २७ फोटो आणि पाच व्हिडिओ आहेत. यातून त्यांनी साडेतीन कोटी रुपये उधळल्याचा खळबळजनक आरोपही केला. मात्र, बावनकुळे यांनी हे सर्व आरोप फेटाळत आपण कुटुंबासह मकाऊ येथे गेलो होतो, असे म्हटले. दुसरीकडे भाजपाने आदित्य ठाकरे यांच्या हातात ग्लास असलेले एक छायाचित्र प्रसिद्ध करून पेल्यात कोणत्या ब्रँडची व्हिस्की आहे, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे ठाकरे गट-भाजपात फोटोवॉर रंगला आहे.

राज्यात एकीकडे आरक्षणावरून वाद रंगला आहे, तर दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्याही फैरी सुरू आहेत. त्यात भाजप आणि ठाकरे गट यांच्यात तर जोरदार वाक्युद्ध सुरू आहे. राज्यात राजकीय संघर्ष विकोपाला गेल्याने रोज नवे गौप्यस्फोट होत आहेत. आज खा. संजय राऊत यांनी आज एक्स या समाजमाध्यमावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील कॅसिनोतला फोटो प्रसारित केला. ‘महाराष्ट्र पेटलेला आहे…

आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसेच माझ्याकडे आणखी २७ फोटो आणि ५ व्हिडीओ आहेत. ते समोर आणले तर भाजपाला दुकान बंद करावे लागेल, असा इशारा दिला. १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ साधारणपणे साडेतीन कोटी रूपये जुगारात उडवले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. ते म्हणतात कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का, जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, झाला तेवढा तमाशा पुरेसा आहे, असे एका पाठोपाठ ट्विट करून संजय राऊत यांनी भाजपावर आरोपांचा भडिमार केला.

बावनकुळेंनी आरोप फेटाळले
संजय राऊत यांचे सर्व आरोप बावनकुळे यांनी फेटाळून लावले आहेत. मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणी तरी काढलेला हा फोटो आहे असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

भाजपाकडून आदित्य ठाकरेंचा फोटो प्रसिद्ध
भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यातून संजय राऊत यांचे आरोप फेटाळताना आदित्य ठाकरे यांच्या हातात ग्लास असलेला एक फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होते, तेथील हा परिसर आहे. ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ, आदित्य ठाकरेंच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की आहे?’’ असा प्रश्न भाजपाने संजय राऊतांना विचारला आहे.

फोटोची सीबीआय चौकशी करा ! -नाना पटोले
या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील उडी घेतली आहे. हा फोटो गंभीर आहे. याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. राज्य एकीकडे दिवाळखोरीत जात आहे. कंत्राटदारांना पैसे मिळत नाहीत म्हणून ते संपावर जात आहेत. राज्याची तिजोरी खाली असताना भाजपा प्रदेशाध्यक्षांकडे इतका पैसा आला कोठून याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असे नाना पटोले म्हणाले आहेत.

विकृत मानसिकतेचे दर्शन ! फडणवीसांचा राऊतांवर पलटवार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांच्या आरोपांवर तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली. ‘संजय राऊत यांची विकृत मानसिकताच यातून दिसून येते. ते किती डेस्प्रेट झाले आहेत हे त्यातून दिसून आले. चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या संपूर्ण परिवारासहीत त्या हॉटेलमध्ये थांबले होते. जेथे त्यांनी जेवण केलं, तिथे ते थांबले होते तेथे रेस्टॉरंट आणि कसिनो हे एकत्रच आहेत. जाणीवपूर्वक अर्धवट फोटो ट्वीट केला आहे. पूर्ण फोटो जर ट्वीट केला तर दिसून येते की, जेथे बावनकुळे बसलेले आहेत तेथे त्यांची पत्नी आहे, मुलगी आहे पूर्ण परिवार आहे. तेव्हा ही विकृत मानसिकता कुठेतरी संपवली पाहीजे, त्याची आज गरज आहे. तर एवढं फस्ट्रेशन योग्य नाही असा पलटवार त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR