35.6 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रआईच्या प्रचारासाठी रेवती सुळे मैदानात !

आईच्या प्रचारासाठी रेवती सुळे मैदानात !

बारामती : लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार दिवसेंदिवस अधिक जोर पकडत आहे. या मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. सुनेत्रा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजयी अशी लढत पहायला मिळणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी अजितदादांनी अधिक जोर लावला असून सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार रणनीती आखत आहेत. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे या देखील आपल्या आईच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या असल्याचे पहायला मिळत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्याने महाविकास आघाडी तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत बारामती मतदारसंघावर महायुतीच्या माध्यमातून विजय मिळवायचाच असा संकल्प केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने केला आहे.

बारामतीची लढत पवार विरुद्ध पवार अशी असल्याने पवार कुटुंबातील सदस्यांनी देखील निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार, जय पवार प्रचारात उतरले आहेत. तर आमदार रोहित पवार हे सुळे यांच्या बाजूने प्रचार करत आहेत. आता सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे या देखील आपल्या आईच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या असल्याचे पहायला मिळत आहे. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार हे देखील प्रचारात उतरले आहेत. बारामती शहरात या दोघांनी पदयात्रा काढत सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला.

 

यापूर्वी दोनवेळा बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांना पराभवाचा धक्का देण्याचे स्वप्न भाजपने पाहिले होते. मात्र त्यामध्ये यश आले नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारला जाहीरपणे पाठिंबा देत सत्तेत आणि पर्यायाने महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या माध्यमातून बारामतीचा गड या मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी भाजपने महायुतीचे उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह केंद्रातील नेत्यांनी ताकद लावली आहे. सुळे यांचा पराभव झाल्यास ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा तो पराभव असणार आहे. त्यामुळे या जागेसाठी साम-दाम-दंड भेद याचा वापर करून विजय मिळविण्याचा प्रयत्न महायुतीचा राहणार आहे. या मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्याचा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे नियोजन देखील या मतदारसंघात केले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR