31.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeराष्ट्रीयअमेठीतून रॉबर्ट वाड्रा काँग्रेसचे उमेदवार ?

अमेठीतून रॉबर्ट वाड्रा काँग्रेसचे उमेदवार ?

अमेठी : उत्तर प्रदेशमधील अमेठी लोकसभा मतदारसंघातील राजकीय लढाईची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात काँग्रेस-सपाची आघाडी आहे. तर अमेठीची जागा काँग्रेसची असून अद्याप काँग्रेसने येथून आपला उमेदवार जाहीर केला नाही. दुस-या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी पार पडणार असून, त्यानंतर राहुल गांधी अमेठीचा दौरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच बुधवारी सकाळी अमेठीत नवे दृश्य पाहायला मिळाले. येथील गौरीगंज शहरासह काँग्रेस कार्यालयात एक पोस्टर लावण्यात आले आहे, ज्यामध्ये ‘अमेठी की जनता करे पुकार रॉबर्ट वाड्रा अब की बार’ अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. गौरीगंज येथील काँग्रेस कार्यालयासह संपूर्ण शहरात हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामुळे काँग्रेस यावेळी रॉबर्ट यांना अमेठीतून निवडणूक रिंगणात उतरवणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी ४ एप्रिल रोजी एक विधान केले होते की, अमेठीच्या जनतेची इच्छा आहे की मी माझे राजकारणातले पहिले पाऊल अमेठीतून टाकावे आणि येथून खासदार व्हावे. कारण १९९९ च्या निवडणुकीत जेव्हा त्यांनी प्रियंकासोबत प्रचार केला तेव्हा तो फक्त अमेठीत होता. त्यावेळचे राजकारण वेगळे होते. वाड्रा यांच्या या वक्तव्यानंतर गौरीगंजमध्ये ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आल्याने राजकारण तापले आहे. याचे विशेष कारण म्हणजे एकेकाळी गांधी घराण्याचा गड मानल्या जाणा-या अमेठीमध्ये २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी यांचा भाजपच्या स्मृती झुबिन इराणी यांनी ५५ हजार १२० मतांनी पराभव केला होता.

आता २०२४ च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशा स्थितीत भाजपने येथून परत इराणी यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. आधी रॉबर्ट वाड्रा यांचे वक्तव्य आणि आता पोस्टर लावण्यामागचा अर्थ म्हणजे काँग्रेस यावेळी वाड्रा यांच्यावर डाव लावणार असेच स्पष्ट होत आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. दरम्यान, अमेठीतील जनता विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री इराणी यांच्यावर चांगलीच नाराज असून, अमेठीतील नागरिकांनी दिल्लीत गांधी कुटुंबाची भेट घेऊन येथून राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केली होती. मात्र आता वाड्रा यांच्या एन्ट्रीमुळे भाजपच्या गोटात धाकधूक सुरू झाल्याचे राजकीय तज्ज्ञांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR