34.1 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडारॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा तिसरा पराभव

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा तिसरा पराभव

बंगळूूरू : लखनौ सुपर जायंट्सच्या युवा गोलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांच्या घरच्या मैदानावर नांग्या टेकायला लावल्या. मयांक यादवच्या वेगाने पुन्हा एकदा प्रतिस्पर्धींना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. देवदत्त पडिक्कल फलंदाजीत अपयशी ठरला असला तरी त्याने भन्नाट थ्रो करून फॅफ ड्यू प्लेसिसला रन आऊट केले आणि आरसीबीचे ग्रह फिरले. त्यानंतर त्यांना संघर्ष करूनही पराभव टाळता आला नाही.

विराट कोहली व फॅफ यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करून देताना ४.२ षटकांत ४० धावा फलकावर चढवल्या. मणिमारन सिद्धार्थने एलएसजी पहिला धक्का देताना विराटची ( २२) विकेट मिळवली. एक धाव घेण्याच्या प्रयत्नात फॅफ ( १९) रन आऊट झाला. यादवने त्याच षटकात चेंडू टाकून ग्लेन मॅक्सवलेला भोपळ्यावर बाद केले. त्यानंतर यादवने कॅमेरून ग्रीनचा भन्नाट चेंडूवर त्रिफळा उडवून आरसीबीची अवस्था बिनबाद ४० वरून ४ बाद ५८ अशी केली. रजत पाटीदार व अनुज रावत यांनी काही काळ डाव सावरला होता. पण, अनुजला ( ११) एक जीवदान मिळूनही मोठी खेळी करता आला नाही. पाटीदार ( २९) संघर्ष करत होता, परंतु मयांकच्या वेगासमोर तोही फसला आणि पडिक्कलने सुरेख झेल घेतला.

मयांकने ४ षटकांत १४ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या होत्या. दिनेश कार्तिकची विकेटही मयांकने मिळवली होती, परंतु डीआरएसने त्याला वाचवले. महिपाल लोमरोर सुरेख फटकेबाजी करून आरसीबीच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या. महिपालने सामना खेचून आणलेला पाहून आरसीबीचे फॅन्स पुन्हा प्रफुल्लीत झाले. पण, दिनेश कार्तिक ( ४) च्या विकेटने पुन्हा त्यांचे टेंशन वाढले. मयांक डागरही भोपळ्यावर रन आऊट झाला. महिपाल ही शेवटची आशाही १८ व्या षटकात मावळली. यश ठाकूरने त्याला बाद केले. महिपालने १३ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३३ धावा केल्या. मोहम्मद सिराजने १९व्या षटकात सलग दोन षटकार खेचून फॅन्सला खूश केले. आरसीबीचा संपूर्ण संघ १५३ धावांवर तंबूत परतल्याने एलएसजीचा २८ धावांनी विजय पक्का झाला.

तत्पूर्वी, क्विंटन डी कॉक आणि निकोलस पूरन यांच्या फटकेबाजीने एलएसजीला १८१ धावांपर्यंत पोहोचवले. शेवटच्या दोन षटकांत निकोलसने उत्तुंग फटकेबाजी केली. ग्लेन मॅक्सवेलने ( ४-०-२३-२ ) आरसीबीला दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. क्विंटन ५६ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ८१ धावांवर माघारी परतला. पूरनने २१ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४० धावा केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR