36.3 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरभीमरायाच्या स्वागतासाठी शहर झाले भीममय

भीमरायाच्या स्वागतासाठी शहर झाले भीममय

सोलापूर : शहरात सर्वत्र चौकाचौकांमध्ये स्टेज… घरोघरी सारवण, रंगरंगोटी व खाद्यपदार्थ बनविण्याची रेलचेल… मंडळांसह प्रत्येक घरावर विद्युत रोषणाई… रस्त्याच्या कडेला निळे ध्वज… अभिवादन व्यक्त करणाऱ्या कमानी… खरेदीसाठी जाणारे कुटुंबीय… घरांचे दार, वस्त्यांचे गेट अन रस्ते… तोरण, पताका, पंचशील ध्वज आणि निळ्या कमानी, तोरण, पताकांनी शहरातील कानाकोपऱ्यात, वस्त्या-वस्त्या महामानवाच्या जयंतीच्या जल्लोषात न्हाऊन निघाल्या असून जणू संपूर्ण शहरच भीममय… ‘जयभीम ‘मय होऊ लागले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याच्या तयारीत हजारो अनुयायी अनेक आठवडे रात्री जागून काढत आहेत. या सर्व घटनेला निमित्त आहे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे. हा सर्व प्रसंग थोरला राजवाडा अर्थात (मिलिंद नगर) तसेच शहर परिसरातील असून जयंतीच्या तयारीला वेग आल्याचे दिसून येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर परिसरात प्रत्येकजण आपापल्या परीने तयारी करण्यात व्यस्त आहे. जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र चौका-चौकांमध्ये स्टेज उभारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारे फलक लावण्यात येत आहेत.

रस्त्याच्या कडेला निळे ध्वज आणि अभिवादन व्यक्त करणाऱ्या कमानी उभारण्यात आल्याने सर्वत्र जयंती उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर भीमजयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी आतापासूनच सुरुवात झाली आहे. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर वेगवेगळ्या छबीतील बाबासाहेबांचे छायाचित्र, त्यांचे विचार, तत्त्वज्ञान, संदेश पाठवून महामानवाच्या महान कार्याचे स्मरण करण्यात येऊ लागले आहे. सोशल प्लॅटफॉर्मवर आंबेडकरी विचारांवर मार्गदर्शन, प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले. देशाचे अर्थकारण, राजकारण, समाजकारण, संविधान, कायदे निर्मिती, ऊर्जा, वनसंवर्धन अशा विविध क्षेत्रांत बाबासाहेबांच्या बहुआयामी कर्तृत्वावर प्रकाश टाकणारे संदेश सर्वत्र फिरू लागले आहेत.

शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तयारीला वेग आला आहे. रविवारी (दि. १४) जयंती असून बाजारपेठेत निळे झेंडे, पताके विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर बिल्ले, शेले खरेदीसाठीही गर्दी होत आहे. डॉ. आंबेडकर जयंतीचे वातावरण सुरू झाले असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बाजारपेठेतही जयंतीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध झाले आहे. यंदाही जयंती उत्सव उत्साहातच करण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR