36.3 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरटँकर मागणी करणाऱ्या ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्याची तहसीलदारांची धमकी

टँकर मागणी करणाऱ्या ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्याची तहसीलदारांची धमकी

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने ग्रामपंचायतीने गेल्या १५ दिवसापूर्वी प्रशासनाकडे टँकरची मागणी केल्याने तहसीलदार मदन जाधव हे पाणीटंचाई पाहण्यासाठी आंधळगाव येथे आले होते. त्यावेळी त्यांना येथील ग्रामस्थांनी गावाला तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून टैंकर त्वरित सुरू करावेत अशी मागणी केली असता, तहसीलदारांनी टँकर सुरू करणार नाही, तुम्ही मला सांगणारे कोण? असे म्हणत तुमच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ३५३ चा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पोलीस निरीक्षकांना फोन लावत दोन पोलीस बोलावून घेत धमकवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या या उद्दाम व अरेरावीच्या कारभारामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांना पाणीटंचाई जाणवू नये यासाठी सातत्याने धडपडणारे लोकप्रतिनिधी आ. समाधान आवताडे, जिल्हाधिकारी या प्रकरणी कोणती कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

तहसीलदार मदन जाधव, गट विकास अधिकारी कदम व पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पांडव यांच्या पथकाने टंचाईग्रस्त गावांची पाहणी केली. या पथकाने आंधळगाव येथे पाणीपुरवठा विहिरीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नवीन आंधळगाव प्रादेशिक योजनेच्या कामाची एमजेपीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता त्यांनी काम पूर्ण व्हायला पंधरा दिवस लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी, या योजनेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यापासून आश्वासने दिली जात असल्याने योजना चालू होईपर्यंत आंधळगावला टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असता, तहसीलदार मदन जाधव यांनी मी टैंकर सुरू करणार नाही, असे सांगत तुम्ही टँकरची मागणी करणारे कोण, असे म्हणत तुमच्यावर शासकीय कामात अडथळा आणून गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देत तातडीने दोन पोलीस बोलावून घेत हुकुमशाही पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांच्या धमकीला भीक न घालता आम्ही ग्रामपंचायतीला कर भरत असू न पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करीत आहोत, आमच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा तो करा, असे सांगितले.

तालुक्यातील पाणी टंचाई पाहणी प्रस्ताव दिले आहेत, परंतु खर्च वाचवून प्रशासनाकडून शाब्बासकी घेण्याच्या प्रयत्नामुळे टँकर देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचे कारण सांगत टाळाटाळ केली जात आहे. तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. आंधळगाव, नंदूर प्रादेशिक योजना गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. भोसे प्रादेशिक योजना बंदपडत असते. तसेच त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात पावसाचे प्रमाण कमी असल्याने येथील जल स्रोत पूर्णतः आटलेले आहेत, त्यामुळे अनेक गावासह वाड्यावर पाणीटंचाई जाणवत आहे.

तालुक्यातील पाणी टंचाई पाहणी करण्याच्या निमित्ताने मी सहा गावांना भेटी देऊन परिस्थिती जाणून घेतली, परंतु प्रत्येक गावात पाण्याचे टैंकर तातडीने सुरू करा, अशी मागणी वारंवार होत होती, सद्या असणाऱ्या पाणीपुरवठा योजना असताना टैंकर देण्यासंदर्भात काही प्रशासकीय नियम अटी असल्याने तसेच निवडणुकीचा ताण असल्याने आंधळगाव येथे पाण्याचा टँकर सुरू करावा अशी मागणी करणाऱ्या नागरिकाला गुन्हा दाखल करण्यासंदर्भात चुकीच्या पद्धतीने बोललो होतो. परंतु माझा तसा कोणताही हेतू नव्हता. असे मंगळवेढा तहसिलदार मदन जाधव यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR