40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरविद्यापीठ व महाविद्यालयांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा : डॉ. शैलेंद्र देवळाणकर

विद्यापीठ व महाविद्यालयांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा : डॉ. शैलेंद्र देवळाणकर

सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ प्राचार्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० ‘ संदर्भात विद्यापीठात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उदघाटन डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्र-संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० ची होणारी अंमलबजावणी व त्याचा आढावा शासन स्तरावरून अशा प्रकारच्या कार्यशाळेतून घेतला जात असल्याचे डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले.अशा प्रकारची पहिली कार्यशाळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

डॉ. देवळाणकर पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० संदर्भात शासन स्तरावरून विविध बैठका, कार्यशाळा व स्कूल कनेक्ट कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. आज पदवी स्तरावरील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची व पालकांची उदासीनता दिसून येते. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत त्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग,भारतीय ज्ञान परंपरा आणि कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० हे विद्यार्थी हितासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

भारताला विकसनशीलतेकडून ते विकसित भारताकडे जाण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून भारताला मानव संसाधनाचे महत्त्वाचे ठिकाण बनवायचे असेल तर आपले उच्च शिक्षण गुणवत्तापूर्ण असायला हवे. त्यासाठी विद्यापीठांनी व महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा असे आवाहन प्र- संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले.

या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० च्या सुकाणू समितीचे अध्यक्ष तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० पूर्वीची शैक्षणिक पद्धतीसाचेबंद होती. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांना पेलेल व आवडेल असे शिक्षण मिळणार आहे. ‘ स्वयंम ‘ सारख्या ऑनलाईन कोर्सेसकरिता अनेक संस्था मिळून एकमेकांशी सामंजस्य करार करून विचारांची देवाणघेवाण करीत असल्याचे डॉ.करमळकर यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी ऑन जॉब ट्रेनिंग फक्त औद्योगिक संस्थेत अथवा कंपनीत पूर्ण करायचे नसून आपल्या सभोवताली असणाऱ्या संस्था, ग्रंथालये, वित्त विभाग, छोटे व्यावसायिक, साखर कारखाने इत्यादी ठिकाणी देखील विद्यार्थ्यांना अनुभव देता व घेता येऊ शकतात. भारतीय ज्ञान परंपरा खूप समृद्ध असून वैविध्यपूर्ण ज्ञानाचा खजिना यात असल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करताना या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञानपरंपरेतील विविध बाबी समाविष्ट करता येऊ शकतात याविषयी डॉ. करमळकर यांनी उपस्थितांना सोदाहरण मार्गदर्शन केले.

अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. विद्यापीठ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० ची अंमलबजावणी करण्यात नेहमीच अग्रेसर असून पुढेही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात विद्यापीठ नेहमी पुढाकार घेईल अशी ग्वाही कुलगुरूंनी दिली.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्र- कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, विभागीय सहसंचालक डॉ. नलिनी टेंभेकर, कुलसचिव योगिनी घारे, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, विविध प्राधिकरणाचे सदस्य, संकुल संचालक ,शिक्षक यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR