लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, सौ. सुवर्णाताई दिलीपराव देशमुख, रीड लातूर उपक्रमाच्या संस्थापक सौ. दीपशिखाताई धिरज देशमुख यांनी शनिवारी बाभळगाव येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
लोकशाही व्यवस्थेतील मतदान हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आणि कर्तव्य आहे. ग्रामीण भागात बदल घडवून जीवनमान सुधारण्यासाठी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या अत्यंत महत्त्वाच्या संस्था आहेत. या संस्थांमध्ये पारदर्शक, लोकाभिमुख गतिमान प्रशासन येण्यासाठी देशमुख कुटुबियांनी मतदान केले आहे, असे सांगून लातूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समित्यांमध्ये काँग्रेस आघाडीला बहुमत मिळेल, असा विश्वास माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देत, उच्चशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांची निवड करुन, पदाधिका-यांना जबाबदारीचे वाटप आणि माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हाभरात निर्माण केलेला प्रचाराचा झंझावात, यामुळे जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने शेवटच्या टप्प्यापर्यंत आपली आघाडी कायम राखली आहे. यामुळे महानगरपालिकेप्रमाणेच लातूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समित्यांवर काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकेल, असे चित्र निर्माण झाले आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ गटांमध्ये तर जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांच्या ११८ गणांमध्ये शनिवारी उत्स्फुर्तपणे मतदान झाले. मतदानादरम्यान महिला आणि युवकांमध्ये उत्साह होता.

