जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील रावजी तांडा येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे अखेर येथील तांडावाशीयांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. हे उपोषण सुरू केल्यानंतर प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर तांडावासीयांनी उपोषण मागे घेतले.
रस्त्यासाठी जळकोट तहसीलसमोर दि. १५ एप्रिलपासून उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुस-या दिवशी जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली . उपोषणकर्त्यांना रावजी तांड्यास जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. जळकोट तालुक्यातील अतनूर ग्रामपंचायत अंतर्गत रावजी तांडा येतो. या तांड्यातील नागरिकांनी अनेक वेळा आम्हाला रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. दि १७ जून तसेच ८ मार्च २०२६ रोजीही या रस्त्यासाठी अर्ज दिला होता मात्र याबाबत कोणताही निर्णय झाला नाही.
रावजी तांडा येथे तसेच तालुक्याच्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक तसेच रुग्ण व सामान्य शेतक-यांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तांडा आहे परंतु या तांड्यास रस्ताच नाही . येथील नागरिकांची रावजी तांडा जळकोट रोड इथेपर्यंत रस्ता करावा, अशी मागणी आहे. रस्ता करणार असल्याचे आश्वासन जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिले. यावेळी सभापती प्रतिनिधी संभाजी कोसंबे, उपसभापती माधव वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी रमणकुमार आदावळे यांच्या उपस्थितीत गावक-यांनी आपले उपोषण मागे घेतले.

