Homeलातूरबालविवाह करतो मुलांच्या मूलभूत हक्कांवर गंभीर परिणाम 

बालविवाह करतो मुलांच्या मूलभूत हक्कांवर गंभीर परिणाम 

लातूर : प्रतिनिधी
येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात दि. १६ एप्रिल रोजी सखी सावित्री समिती व विशाखा (अंतर्गत तक्रार) समितीमार्फत बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन व्हीएलसी हॉल मध्ये करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना बाल हक्क कार्यकर्ते व समाजसेवक सद्दाम शेख यांनी बालविवाह हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून तो मुलांच्या मूलभूत हक्कांवर गंभीर परिणाम करतो, असे सांगीतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. भीमराव पाटील तर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून बाल हक्क कार्यकर्ते व समाजसेवक सद्दाम शेख उपस्थित होते. शेख यांनी १८ वर्षाखालील मुली व २१ वर्षाखालील मुले ही बालके असतात व त्यांची सुरक्षितता किती महत्त्वाची असते, त्यासाठी कोणकोणते कायदे आहेत? याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बालविवाह हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून तो मुलांच्या मूलभूत हक्कांवर गंभीर परिणाम करतो. अल्पवयात विवाह झाल्यामुळे विशेषत: मुलींच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. तसेच लवकर गर्भधारणा झाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे मुलींचे शिक्षण अर्धवट राहते आणि त्यांच्या स्वप्नांना व करिअरच्या संधींना मर्यादा येतात. बालविवाहामुळे गरिबीचे चक्र कायम राहण्याची शक्यता वाढते आणि समाजाच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो.
 त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून अशा घटनांची माहिती तात्काळ संबंधित प्रशासनाला देणे आणि या सामाजिक कुप्रथेविरुद्ध एकत्रितपणे आवाज उठवणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूला नातेवाईक, शेजारी, समाजात होणारे बालविवाह रोखण्यासाठी आपली भूमिका महत्वाची आहे असेही ते म्हणाले. डॉ. भीमराव पाटील बोलताना म्हणाले की, सर्व विद्यार्थ्यांनी बालकांचे हक्क, अधिकार व कायदे याविषयी जागरूक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉ. स्वाती फेरे यांची कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. रत्नराणी कोळी यांनी, आभार प्रदर्शन प्रा. माया जाधव, सूत्र संचलन प्रा. सविता डोणगापुरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR