लातूर : प्रतिनिधी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत लातूर जिल्ह्यासाठी चलन पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियुक्त स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत अपु-या चलन पुरवठ्यामुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय व सर्व १२२ शाखेत तात्पुरती चलन रोख रक्कमेची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेकडून आरबीआय/ एसबीआय यांना पाठपुरावा, समन्वय सुरू असून मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी रक्कम एसबीआय बँकेकडून पुरवठा होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. याबाबत लातूर जिल्हा बँकेकडून एसबीआय बँकेकडे तसेच राज्यातील इतर बँकांकडे विनंती करण्यात येत आहे त्यामुळे जिल्हा बँकेच्या ग्राहक, ठेवीदारांनी बँकेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा बँकेने केले आहे
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत चेस्ट (एसबीआय) बँकेशीवाय इतर बँकेतून चलन प्राप्त करून ग्राहकांना चलन पुरवठा केला आहे परंतु आता महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या चारही राज्यात चलन तुटवडा निर्माण झाला आहे यासाठी लातूर जिल्हा बँकेकडून सातत्याने चेस्ट बँकेसह इतर बँकेकडे पाठपुरावा सुरू आहे अल्पावधीतच सुरळीत चलन पुरवठा होईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत ग्राहकांना चलन पुरवठा वेळेवर होत नसल्याने दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे बँकेने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

