लातूर : प्रतिनिधी
शहरातील जुन्या एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ई-१/२ व १/३ मधील मुंदडा ट्रेडर्स या अॅल्युमिनियम कोटिंग व अॅल्युमिनियम शीट निर्मिती करण-या उद्योगामध्ये दि. १६ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ३.१५ वाजण्याच्या सुमारास कोटिंग प्रक्रियेसाठी वापरण्यात येणा-या बॉयलरचा अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली. लातूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दुपारी ३.३२ वाजता कॉल आल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने कारवाई सुरु केली. तब्बल ३ तासांच्या अथक परिश्रमानंतर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे.
मुंदडा ट्रेडर्समध्ये कोटिंग प्रक्रियेसाठी वापरण्यात येणा-या बॉयलरचा अचानक स्फोट झाला आणि काही क्षणात आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले आहे. तापमानाचा पारा ३९ अंश सेल्सिअस होता. होरपळून काढणा-या उन्हात आग लागल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड उष्णता वाढली होती. धुराचे लोट उंचच उंच उठले होते. आगीदरम्यान चार ते पाच स्फोटही त्यामुळे आग नियंत्रणात आणण्याचे काम करणा-या अग्निशमन दलाच्या जवानांनासाठीही एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. धुराचे लोट आशात उंच पसरल्याने लांबुनही आग दिसत होती. त्यामुळे शहरातून बरेच नागरिक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी गर्दी केल्यानेही अग्निशमन दलाच्या कामात अडथळा येत होता. पोलिसांनी नागरिकांना तेथून जाण्याचे आवाहन करुनही उपयोग होत नव्हता. त्यामुळे पोलिसांना कसरत करावी लागली. दरम्यान मुंदडा ट्रेडर्सच्या आगीतून घरगुती गॅसचे सुमारे १५ सिलिंडर आगीतून बाहेर काढण्यात आले. मुंदडा ट्रेडर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडरचा औद्योगिक वापर कसा काय होऊ शकतो?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनकडून तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष, लातूर तसेच वरिष्ठ अधिका-यांना कळविण्यात आले. त्यानंतर महापालिका अग्निशमन दल व एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल करण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सायंकाळी सुमारे ६ वाजेपर्यंत आग पूर्णपणे नियंत्रणात आणून विझविण्यात यश मिळविले. या स्फोटामुळे परिसरातील इतर कोणत्याही औद्योगिक युनिटला कोणतेही नुकसान झालेले नाही. घटनेच्या अनुषंगाने महापालिकेचे उपायुक्त खणसोळे यांच्याशी समन्वय साधून महापालिकेचे फायर ऑफिसर बापुसाहेब जाधव यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. अग्निशमन दालाच्या जवानांनी त्यांच्या गाड्यांच्या ३० ते ३५ फे-या करीत आग नियंत्रणात आणली.

