29.8 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeनांदेड...अन्यथा नांदेडात सन्नाटा!

…अन्यथा नांदेडात सन्नाटा!

नांदेड : चारुदत्त चौधरी
येत्या २६ एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्याचे दुस-या टप्प्यातील लोकसभा निवडणूक पार पडणार आहेत. यावेळी नांदेडकरांनी स्वयंस्फुर्तीने मतदान करून लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे. एक ज्येष्ठ नागरिक घरातील चार मते निश्चितच बदलू शकतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे सत्ताधा-यांनी लक्ष देऊन त्या निकाली काढाव्यात. मतदारांनीदेखील केंद्रात ज्यांची सत्ता येऊ शकते, अशांनाच मते देऊन शहराचा विकास घडवून आणावा. अन्यथा विरोधी बाकावर बसणा-या उमेदवाराला मत देणे म्हणजे आपले मत वाया घालवणे होय, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आजघडीला केंद्रात भाजपची सत्ता येऊ शकते, असे भाकित अनेक राजकीय विश्लेषक करीत आहेत.

त्याकरिता नांदेडातही चिखलीकरांना मतदान करणे आवश्यक आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांच्याचसोबत दूरदृष्टी असलेले नेते खा.अशोक चव्हाण खांद्याला खांदा लावून प्रचार आणि प्रसार करीत आहेत. अशावेळी असेच म्हणावेसे वाटते की, खा.चिखलीकर विजयी झाले तर विकासाची गती टिकेल अन्यथा नांदेड जिल्ह्यात सन्नाटा होईल, असे मत ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक तेरकर यांनी ‘एकमत’शी बोलताना व्यक्त केले. संपूर्ण देशात निवडणुकीचे वारे चांगलेच वाहत आहे. २६ एप्रिलला दुस-या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्याचादेखील समावेश आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी याची जिल्हा प्रशासन प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करीत आहे. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तर ध्यासच घेतला आहे.

गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी कशी वाढवता येईल, यासाठी विविध स्पर्धा, जनजागृतीमधून महाविद्यालय, शासकीय कार्यालय, बसस्थानक, अनेक गर्दीच्या ठिकाणी जाऊन मतदान करण्यासाठी विनंती करीत आहेत. त्यामुळे यावेळी नांदेड जिल्ह्याचा मतदानाचा टक्का निश्चित वाढेल, असे तेरकर म्हणाले. नांदेड जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक अटीतटीची होईल असे बोलले जात आहे. सामान्य नागरिक आणि धनदांडगे यांच्यातील ही निवडणूक असल्याचे सांगितले जात आहे. परंतु नांदेडकरांनी विकासाकडे आपला कौल देणे आवश्यक आहे. आजघडीला देशात ३५० पेक्षा जास्त उमेदवार भाजपचे निवडून येतील, असे भाकित अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला यांनी व्यक्त केले आहे. कारण मोदींना पर्यायी चेहरा नसणे ही काँग्रेसची अडचण आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा भाजपला अधिक यश मिळेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे नांदेडकरांनीदेखील सत्ताधा-यांच्या पारड्यात आपले मत टाकून त्यांना विजयी करावे, असेही ते म्हणाले.

भारतीय जनता पार्टीत नव्यानेच प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खा.अशोकराव चव्हाण हे दूरदृष्टीचे नेते आहेत. गुरु-ता-गद्दी सोहळ्याच्या निमित्ताने नांदेडमध्ये अनेक विकास कामे मार्गी लावली. यात नवीन उड्डाणपुल, अंतर्गत रस्ते डांबरीकरणातून सिमेंटमध्ये रुपांतरित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ निर्माण झाले. नांदेडातून आजघडीला ७० च्या वर रेल्वे धावत आहेत. देशाला जोडण्यासाठी नांदेडातून विमानसेवा सुरू करण्यात आली. गुरुद्वारा परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले. गोदावरी काठावर विविध घाटांची निर्मिती करण्यात आली. नांदेड शहरात शैक्षणिक हब तयार झाले. यासारखी अनेक उदाहरणे देता येतील. भविष्यात नांदेडकरांना विकासाची गती कायम ठेवायची असेल तर चिखलीकर यांच्या पारड्यात वजन टाकणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी एकमतशी बोलताना व्यक्त केले. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या फार थोड्या मागण्या आहेत.

त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात मिळणारी सवलत कोरोना काळात बंद झाली ती पूर्ववत सुरू करावी. ज्येष्ठ नागरिकांना सरसकट दरमहा सहा हजार मानधन देण्यात यावे. आई-वडील चरितार्थ कायदा २००७ अधिनियम, २०१० ची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, ज्येष्ठ नागरिक मंत्रालय स्थापन व्हावे, केंद्र आणि राज्य स्तरावर कॅबिनेट मंत्री अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात यावे, ज्येष्ठ नागरिक धोरणात सुधारणा करून आर्थिक लाभाच्या धोरणांची स्पष्टता व्हावी, अशी अपेक्षा आहे. ज्येष्ठांचा कोणाला विरोध नाही. पण मत देताना सर्वांनीच विचारपूर्वक मतदान करावे, अशी आमची आग्रहाची विनंती आहे. काँग्रेस, भाजप अथवा इतर पक्षाची आम्ही बाजू घेत नाही. आम्ही विकासप्रेमी आहोत अन् सत्ताधारीच विकास करू शकतो. त्यामुळे सत्ता येणा-यालाच मतदान करावे, असेही तेरकर शेवटी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR