37.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeधाराशिव‘धाराशिव’च्या गत २ निवडणुकांत ‘कांटे की टक्कर’

‘धाराशिव’च्या गत २ निवडणुकांत ‘कांटे की टक्कर’

धाराशिव : मच्छिंद्र कदम
धाराशिव लोकसभेचा १८ वा खासदार होण्यासाठी सध्या या मतदार संघात महाविकास आघाडी विरुध्द महायुती प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फेरी सध्या ऐकावयास मिळत आहेत. त्यामध्ये कोण बाजी मारणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र धाराशिव लोकसभेचा विचार केला तर या मतदार संघात दोन निवडणूकीत चांगलीच फाईट झाली. ती म्हणजे २००४ च्या निवडणूकीत शिवसेनेकडून कल्पना नरहिरे विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रा. लक्ष्मण ढोबळे व २००९ च्या निवडणूकीत डॉ. पद्मसिंह पाटील विरुध्द प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या कांटे की टक्कर अशी लढत झाल्याचे दिसून येते. त्यामुळे आता २०२४ च्या निवडणूकीसाठी राज्यासह धाराशिव लोकसभा मतदार संघात मोठी राजकीय उलथा-पालथ झाली आहे. त्यामुळे विजयी कोण होणार याबाबत अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

धाराशिव लोकसभेची चौदावी निवडणूक २००४ साली होती होती. यावेळी हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. यावेळी शिवसेनेकडून कल्पना रमेश नरहिरे यांनी निवडणूक लढविली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रा. लक्ष्मण ढोबळे रिंगणात होते. यावेळी कल्पना नरहिरे यांना २ लाख ९४ हजार ४३६ मते पडली. तर लक्ष्मण ढोबळे यांना २ लाख ९२ हजार ७८७ मते पडली होती. नरहिरे यांचा केवळ १६४९ मतांनी विजय झाला होता. यामध्ये कल्पना नरहिरे यांना २४.४४ टक्के मते होती तर ढोबळे यांना २४.३ टक्के मते पडली होती.

त्यानंतर २००९ मध्ये १५ लोकसभा निवडणूक खुल्या प्रवर्गातून झाली. यामध्ये पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादीकडून तर प्रा. रविंद्र गायकवाड हे शिवसेनेकडून रिंगणात होते. यावेळी पद्मसिंह पाटील यांना ४ लाख ८ हजार ८४० मते पडली होती. तर शिवसेनेचे रविंद्र विश्वनाथ गायकवाड यांना ४ लाख २ हजार ५३ मते पडली होती. यामध्ये प्रा. रविंद्र गायकवाड यांचा केवळ ६ हजार ७८७ मतांनी पराभव झाला होता. यामध्ये पद्मसिंह पाटील यांना ३३.९४ टक्के तर प्रा. गायकवाड यांना ३३.३७ टक्के मते पडली होती.

मागच्या दोन निवडणुकीत कांटे की टक्कर झाल्याचे दिसून आले. त्यानंतर धाराशिव लोकसभेच्या आजपर्यंतच्या इतर निवडणुका पाहिल्या तर मतांचा मोठा फरक असल्याचे दिसून येते. सध्या १८ व्या लोकसभेची निवडणूक होत आहे. या निवडणूकीत राजकीय उलथा-पालथ मोठ्या प्रमाणात झाली आहे. विशेष म्हणजे २००४ व २००९ मधील झालेली निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुध्द शिवसेना अशी झाली होती. आता होवू घातलेल्या या निवडणूकीत या दोन्ही पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत.

पक्ष फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणूकीचा अंदाज बांधणे सध्यातरी कठीण झाले आहे. मात्र, मागच्या तुलनेत महायुतीचे पारडे जड झाले आहे. त्यामुळे महायुतीतील नेत्यांनी चांगला जोर लावला तर बदल कठीण नाही. परंतु ओमराजे निंबाळक यांचा वैयक्तिक संपर्क प्रबळ ठरू शकतो, असेही बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR