औसा : प्रतिनिधी
औसा ते भादा रस्त्यावर असलेल्या औसा तांड्याजवळ विनापरवाना व कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र न घेता उभारण्यात आलेल्या पोल्ट्री फार्ममुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याने ही अनधिकृत पोल्ट्री तातडीने बंद करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे केली आहे.
औसा तांड्याजवळ पाण्याच्या टाकीजवळ एका सेवानिवृत्त शासकीय अधिका-याने दोन ते तीन वर्षांपूर्वी आपल्या शेतात एक पोल्ट्री सुरू केली होती. सुरुवातीला ही पोल्ट्री शेतात मर्यादित जागेत होती परंतु दिवसेंदिवस पोल्ट्रीची लांबी ,रुंदी वाढत जाऊन शेतातील पोल्ट्री गावठाणात आली त्यामुळे या परिसरात राहणा-या नागरिकांना त्रास होऊ लागला. दुर्गंधीमुळे या परिसरातील ५० पेक्षा अधिक कुटुंबांना त्रास होत आहे. या त्रासाबाबत संबंधित पोल्ट्री चालकास पीडित ग्रामस्थांनी विचारणा केली व दुर्गंधी बंद करावी, अशी विनंती केली परंतु सदरील पोल्ट्रीचालक हा सेवानिवृत्त अधिकारी असल्याने व त्याच्याच विहिरीतून गावाला पाणीपुरवठा होत असल्याने त्याच्या विरुद्ध कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नव्हते.
अखेरीस या परिसरातील ज्या कुटुंबांना त्रास होत आहे त्या कुटुंबातील काही तरुणांनी पुढाकार घेऊन औसा तांडाजवळील ही अनधिकृत पोल्ट्री नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असल्याने तातडीने बंद करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सत्तरधरवाडी व औसा पंचायत समितीकडे करण्यात आली आहे. सदर पोल्ट्रीबाबत यापूर्वीही येथील ग्रामस्थांनी निवेदन देऊन येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका होत असल्याचे निदर्शनास आणून दिलेले असतानाही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

