35 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeसोलापूरइंग्रजांसारखी हुकूमशाही मोदींनी देशात सुरू केली : खा. शरद पवार

इंग्रजांसारखी हुकूमशाही मोदींनी देशात सुरू केली : खा. शरद पवार

अकलूज : तालुका प्रतिनिधी 
राजधानी दिल्ली व आदिवासी झारखंड राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्य केले तर त्यांना तुरुंगात पाठविले. ही इंग्रजांसारखी हुकुमशाही सध्या देशात सुरू आहे. हे हुकुमशाही मोदी सरकार घालविण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी केले. मोडनिंब (ता. माढा) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ खा. शरद पवार यांच्या विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह हजारोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत खा. शरद पवार यांनी देशातील महागाई, मोदींनी दिलेली आश्वासने, त्यांची हुकुमशाही, नोटाबंदी, शेतकरी, शेतीमालाचे भाव, निर्यातबंदी आदींवर भाष्य केले.

मोडनिंब येथील विराट सभेस मार्गदर्शन करताना खा. पवार म्हणाले, २०१४ ला मोदी सत्तेत येण्यापूर्वी देशात पेट्रोल, डिझेल ७० रुपये तर गॅस सिलेंडर ४१० रुपयांना होता. मोदींनी किमती निम्यावर करू म्हणून सांगितले. १० वर्षे देशात त्यांची सत्ता आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. देशात महागाईचा महापूर आला आहे. नोटाबंदीच्या काळात लोक बॅँकेसमोर तासनतास उभा राहात होते. त्यात दुर्देवाने ७०० लोकांचा बळी गेला. देशातील ८७ टक्के तरुण बेरोजगार आहे. आज तो नोकरीसाठी वणवण भटकत आहे. कुठे गेली त्यांची आश्वासने? असा प्रश्न उपस्थित करून, आज शेतकरी नागावला आहे, शेतीमालाला भाव नाही, कांदा, साखर या शेतीमालावर निर्यातबंदी घातली त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. देशात सध्या मोदींची हुकुमशाही सुरू आहे. त्यांच्या विरोधात जो बोलतो त्याला ते तुरूंगात पाठवतात. ही इंग्रजांसारखी हुकुमशाही मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीचे तरुण उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना संसदेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.

धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, खा. शरद पवार, विजयदादांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला माढा लोकसभेची उमेदवारी दिली हे मी माझे भाग्य समजतो. मी देशातील लोकशाही टिकविण्यासाठी राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली आहे. राज्यातील पुरोगामीत्व व स्वाभिमान टिकविण्याचे काम पवारसाहेबांनी केले आहे. या राज्यातील शेतकरी पिचला आहे. शेतीमाल, दूध आदींना दर नाही. शेती, शेतकरी, पाणी या प्रश्नांवर कुणी सत्ताधारी बोलत नाही. जिल्ह्याला गेल्या १५ वर्षात कारभारी राहिला नाही. उजनीला सतरा मालक झाले आहेत. कुणीही उठतो आणि पाणी सोडतो त्यामुळे जिल्ह्याचे संपूर्ण नियोजन बिघडले आहे. जिल्ह्यात केळीचे उत्पादन मोठे आहे. येथे केळी संशोधन केंद्र होणे गरजेचे आहे. तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात मिनी एमआयडीसी होणे गरजेचे आहे. माढ्यात मुलांना उच्चशिक्षण घेण्यासाठी एकही शिक्षण संस्था नाही हे सर्व सुरू करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. नागरिकांनी मला भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी शिवसेना नेते साईनाथ अभंगराव, संजय कोकाटे, धनंजय डिकोळे, संजय पाटील घाटणेकर, उत्तम जानकर, शिवाजीराजे कांबळे, अभिजित पाटील, मिनल साठे आदींची समयोचित भाषणे झाली. या सभेस विराट जनसमुदाय उपस्थित होता. त्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. माढ्यातील खा. पवार यांची ही पहिलीच प्रचाराची सभा असल्याने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रा. हरिदास रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR