38.9 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रकुठे घामाच्या धारा, कुठे अवकाळी मारा

कुठे घामाच्या धारा, कुठे अवकाळी मारा

दिवसभर उष्णतेची लाट, सायंकाळी अवकाळीचा दणका
मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांत वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात आज ब-याच ठिकाणी दिवसभर उष्णतेच्या लाटांचा मारा आणि रात्री अवकाळी पावसाच्या धारा, असे चित्र पाहायला मिळाले. ब-याच भागात आज तापमान प्रचंड वाढले होते. तसेच मराठवाडा, विदर्भासह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजही वर्तवला होता. आज मराठवाड्यासह ब-याच भागात दिवसभर उष्णतेची तीव्रता अधिक होती. मात्र, रात्री अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसादरम्यान वादळाच्या तडाख्यात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यात अवकाळी तडाख्यात मोठे नुकसान झाले.

रणरणत्या उन्हापासून हैराण झालेल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात अनेक भागांना आज अवकाळी पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेल्या ३ दिवसापासून अंगाची लाहीलाही होत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून पारा चाळीशीच्या पार गेल्याने नागरिकांची अक्षरश: लाहीलाही सुरू आहे. मात्र, आज हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात पावसाने हजेरी लावली. शिरोळ तालुक्यात वादळी वा-यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. यासोबतच सांगली जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, पावसामुळे दिलासा मिळाला. सातारा जिल्ह्यातही अवकाळीने हजेरी लावली. वादळी वा-यासह पाऊस झाला. काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली.

उन्हाचा तडाखा वाढला
२४ तासांत उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असून उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उद्यादेखील उत्तर कोकणासाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज कायम आहे.

पुण्यात होर्डिंग कोसळले,
प्रचंड वाहतूक कोंडी
वाघोलीला आज अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. सायंकाळी पुण्यात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली तर वाघोली परिसरात गारादेखील पडल्या. जोराच्या वा-यामुळे साई सत्यम पार्क परिसरात होर्डींग कोसळले. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. होर्डिंग हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR