37.7 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeसोलापूरचैत्री यात्रेसाठी पंढरीत तीन लाख भाविक दाखल

चैत्री यात्रेसाठी पंढरीत तीन लाख भाविक दाखल

पंढरपूर /अपराजित सर्वगोड
पंढरीतील विठुरायाच्या चैत्री वारी सोहळ्यासाठी, पंढरीत तीन लाख भाविकांनी हजेरी लावली. विठूनामाचा जयघोष करीत पंढरीनगरी दुमदुमून सोडली. हरिनामाच्या गजराने मंदिर परिसर न्हाऊन निघाला. पंढरीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा चैत्री वारी सोहळा मोठ्या थाटात पार पडला. शुक्रवार दि.१९ एप्रिल रोजी सुमारे तीन लाख भाविकांनी पंढरीत हजेरी लावली. पंढरपूर शहरातील विविध मठ आणि मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली. दरवर्षीच या वारी सोहळ्यावर उन्हाळ्याचे सावट असते. चैत्रात पडणारे कडक ऊन, अन् पुढे शिंगणापूरला जाण्याची ओढ भाविकांमध्ये असते. यामुळे या वारीला पळती वारी अथवा धावती वारी संबोधले जाते. गेल्या दोन तीन दिवसापासून पंढरी नगरीत भाविकांची गर्दी वाढू लागली होती. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने, विठुरायाचे पदस्पर्श दर्शन बंद होते.

चैत्री वारीच्या पार्श्वभूमीवर हे दर्शन सुरू करण्यात आले असल्याची माहिती भाविकांना होती. यामुळेच गेल्या दोन-तीन महिन्यात थांबलेली भाविकांची वर्दळ या वारीच्या रूपाने पुन्हा सुरू झाली. खाजगी वाहन, बसेस आणि रेल्वेचा प्रवास करून भाविकांनी पंढरी गाठली. मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी मंदिरा सभोवताली कार्पेट बांधण्यात आले आहेत. यामुळे भाविकांना उन्हाचा त्रास होत नाही. याशिवाय दर्शन मंडपात भाविकांना थंड पाणी, चहा, नाश्ता आदींची सोय करण्यात आली आहे. पंढरपूर शहरातील स्टेशन रोड, चौफाळा, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट परिसर, ६५ एकर परिसर आदी परिसर भाविकांनी गजबजवून गेला आहे. हरिनामाच्या गजराने पंढरी नगरी न्हाऊन निघाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR